पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शनिवारी राजकीय पक्षांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता सर्व राजकीय पक्ष घालून दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करुन सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत प्रचार करु शकणार आहेत. निवडणूक आयोगाने आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या दिशा निर्देशानुसार निवडणूक होत असलेल्या राज्यांमध्ये पायी रॅलीला परवानगी दिली आहे.
निवडणूक आयोगाकडून देशभरातील आणि खास करुन निवडणूक होत असलेल्या राज्यांमधील कोरोना स्थितीचा सातत्याने आढावा घेण्यात आला. तसंच आयोगाने कोरोना स्थितीबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठीकीनंतर निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना प्रचाराबाबत मुभा दिली आहे.
यापूर्वी पाच राज्यांच्या निवडणूक प्रक्रियेची घोषणा करताना निवडणूक आयोगाने रोड शो, पदयात्रा, वाहन रॅली आणि मेळाव्यांवरील बंदी 11 फेब्रुवारीपर्यंत वाढवली होती. मात्र सर्व टप्प्यांमध्ये घरोघरी जाऊन प्रचार करणाऱ्यांची संख्या, तसंच प्रचार सभांबाबतच्या नियमांमध्ये शिथिलता दिली होती. तसंच घरोघरी जाऊन प्रचार करणाऱ्यांच्या संख्येत वाढ करुन ती 20 करण्यात आली होती. तर जाहीर सभेत जास्तीत जास्त 1 हजार लोक सहभागी होऊ शकतात. आयोगाने इनडोअर बैठकांमझ्ये सहभागी होणाऱ्यांची अधिकाधिक संख्या 300 ने वाढवून 500 केली होती. दरम्यान, राज्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, राजकीय घडामोडीमुळे कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याची गरज आहे.
देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला तर निवडणूक सुरु असलेल्या राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट होत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येचा आढावा घेतला तर 21 जानेवारीला जवळपास 3 लाख 47 हजारच्या घरात नवे रुग्ण आढलून आले होते. तर 12 फेब्रुवारी म्हणजे शनिवारच्या आकडेवारीनुसार देशभरात 50 हजार रुग्ण आढळून आले आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या राज्यात 22 जानेवारी रोजी एकूण रुग्णांची संख्या 32 हजार इतकी होती. तर 12 फेब्रुवारीला ही संख्या 3 हजारावर आली आहे.