पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख आणि राष्ट्रपती यांचे काल दुबई मधील रुग्णालयात दिर्घ काळाच्या आजारानंतर निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. परवेज मुशर्रफ यांचा जन्म ११ ऑगस्ट १९४३ रोजी दिल्लीच्या दरियागंज याठिकाणी झाला होता. १९४७ रोजी भारताच्या फाळणीदरम्यान मुशर्रफ यांच्या कुटुंबाने पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मुशर्रफ चार वर्षांचे होते. २० जून २००१ ते १८ ऑगस्ट २००८ पर्यंत ते पाकिस्तानचे राष्ट्रपती होते. एप्रिल ते जून १९९९ दरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान कारगिल येथे युद्ध झाले. या युद्धाचे सूत्रधार परवेज मुशर्रफ होते, हे माजी पंतप्रधान नवाब शरीफ यांनी आपल्या पुस्तकातून सांगितले होते. भारतात जन्म होऊन आणि चार वर्ष भारतात राहून देखील परवेज मुशर्रफ भारताच्या विरोधात अनेक कट कारस्थानात सहभागी होते. कधी भारतात येऊन ताजमलहला भेट देणारे, कधी भारतीय सेलिब्रिटी, खेळांडूचे कौतुक करणारे परवेज मुशर्रफ यांचे भारताशी एक वेगळेच प्रेम आणि द्वेषपूर्ण असे नाते होते. त्यांच्यासंबंधी या महत्त्वाच्या पाच बातम्यांवर नजर टाकू.
मुशर्रफ यांनी भारतीय कर्णधाराला दिला होता इशारा
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ हेही क्रिकेटचे चाहते होते. एकदा त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार सौरव गांगुली यांना मोठा इशारा दिला होता. गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने २००४ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. यादरम्यान टीम इंडियाने कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिकेत आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आणि पाकिस्तानचा पराभव केला. यावेळी त्यांनी सौरव गांगुली यांना फोन करुन युद्धाचा इशारा दिला होता.
राणी मुखर्जीने सांगितला होता परवेज मुशर्रफ यांच्या भेटीमागचा ‘तो’ किस्सा
अभिनेत्री राणी मुखर्जीने एका मुलाखतीत परवेज मुशर्रफ यांच्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. परवेझ मुशर्रफ यांची पत्नी बेगम साहेबा मुशर्रफ यांना राणी मुखर्जी आवडत होती. राणीने ‘वीर जारा’ चित्रपटात साकारलेली एका वकिलाची भूमिका त्यांना विशेष आवडली होती. या भेटीत त्यावेळचे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री खुर्शीद मेहमूद कसुरी यांनीही तिला पाकिस्तान भेटीचे निमंत्रण दिल्याचे अभिनेत्रीने सांगितले होते.
हुकूमशहा ते राष्ट्रद्रोही, असा होता मुशर्रफ यांचा प्रवास
मुशर्रफ यांनी तब्बल एक दशक पाकिस्तानवर हुकूमत गाजवली. मात्र २००९ साली त्यांच्यावर आणीबाणी लावल्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. २०१९ साली सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रद्रोहाचा आरोपाखाली मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावली.
धोनीची बॅटिंग आणि त्याच्या लांब केसांचे चाहते होते मुशर्रफ
२००६ च्या दौऱ्यात धोनीने लाहोरमध्ये खेळलेल्या एका सामन्यात तुफानी फलंदाजी करत ४६ चेंडूत ७२ धावा केल्या होत्या. त्याच्या खेळीमुळे भारताने २८९ धावांचे लक्ष्य गाठून सामन्यात विजय मिळवला होता. या सामन्यात धोनीला सामनावीर या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. परवेज मुशर्रफ यांनी धोनीचे कौतुक केले होते. तसेच त्याची लांब केसांची हेअरस्टाईल आपल्याला आवडली असेही ते म्हणाले होते.
भारतावर कारगिल युद्ध लादणारे मुशर्रफ
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असताना परवेज मुशर्रफ यांनी कारगिल युद्धाची आगळीक केली होती. भारतीय सैनिकांनी कारगिल युद्धात असीम शौर्य दाखवले होते. तर याच युद्धाला मुशर्रफ यांचे कट कारस्थान म्हणून ओळखले जाते. आपल्या राजकीय इच्छा पूर्ण करण्यासाठी मुशर्रफ यांनी कारगिलचे युद्ध छेडले होते.