आज दि.६ फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

बीडमध्ये बजाज विमा कंपनी उठली शेतकऱ्यांच्या मुळावर; चूक कंपनीची त्रास शेतकऱ्यांना

राज्यात आर्थिक फसणुकीच्या प्रकारात वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यात आता बीड जिल्ह्यातही एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीड जिल्ह्यात बजाज विमा कंपनी शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचं पाहायला मिळते आहे. कंपनीची चूक असताना याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना दिला जात असल्याचे समोर आले आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यावर साडेबारा कोटी रुपये जमा झाल्यानंतर कंपनीने जवळपास 12 हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांची खाती गोठवली आहेत. जवळपास गेल्या 1 महिन्यांपासून अनेक शेतकऱ्यांचे खाते गोठवले गेले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना ऐन कामाच्या वेळेला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

टीम इंडियाला डिवचण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न, आकाश चोप्राने एका प्रश्नातच संपवला विषय

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ९ फेब्रुवारीपासून बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका सुरू होणार आहे. पहिली कसोटी नागपूरमध्ये खेळली जाणार आहे. या कसोटी आधी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक व्हिडीओ शेअर करून भारताची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने एक प्रश्न विचारत ऑस्ट्रेलियाचं तोंड बंद केलं.क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शेअर केलेला व्हिडीओ एडलेडमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीतला आहे. त्या सामन्यात भारतीय संघ दुसऱ्या डावात फक्त ३६ धावांवर ऑल आउट झाली होती. भारताने ही कसोटी ८ विकेटने गमावली होती. मात्र त्यानंतर भारतीय संघाने जबरदस्त कमबॅक करताना पुढच्या ३ पैकी २ कसोटी जिंकून मालिका खिशात टाकली होती. आकाश चोप्राने याच मुद्द्यावरून प्रश्न विचारत ऑस्ट्रेलियाला उत्तर दिले.

ट्रेनमध्ये व्हॉट्सअपवरुन ऑर्डर करा रेस्टॉरंटमधील जेवण! रेल्वेने जारी केला नंबर

रेल्वे प्रवासादरम्यान मिळणारे जेवण तुम्हाला आवडत नसेल आणि तुम्हाला ते खाण्याची इच्छा नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर आहे.रेल्वेने तुम्हाला दुसरा पर्याय दिला आहे. तुम्ही व्हॉट्सअॕपवर जेवण ऑर्डर करू शकता. रेल्वेच्या PSU IRCTC ने ही नवीन सुविधा सुरू केली आहे. यासाठी +91-8750001323 हा क्रमांकही जारी करण्यात आला आहे.आतापर्यंत ई-कॅटरिंगद्वारे ट्रेनमध्ये खाद्यपदार्थ बुक केले जाऊ शकत होते. त्यात फक्त बुक करण्याची सोय होती, ती वन-वे होती, म्हणजे पर्याय नव्हता किंवा एखादी सूचना द्यायची असेल तर त्यासाठीही व्यवस्था नव्हती.

वनिता खरातच्या लग्नात विशाखा सुभेदारनं नेसलेली साडी होती खूपच स्पेशल

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरातचं नुकतंच लग्न झालं. लग्नासाठी हास्यजत्रेची संपूर्ण टीम गेली होती. अभिनेत्री विशाखा सुभेदारनं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं वनिता खराच्या लग्नातील तिचा सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विशाखानं निळ्या रंगाची खास साडी नेसली आहे. वनिताच्या लग्नात विशाखानं नेसलेली साडी तिच्यासाठी खूपच खास होती. ती खास का आहे याचं कारण तिनं पोस्ट लिहित सांगितलं. विशाखा सुभेदार तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. पण विशाखा सोशल मीडियावर देखील सक्रीय असते. अनेक रील्स ती शेअर करत असते. तिच्या रील्सना चांगला प्रतिसाद मिळत असतो. अशात तिनं नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

विशाखानं वनिताच्या लग्नात नेसलेली साडी ही तिच्यासाठी खूप खास आहे. कारण ती साडी तिनं विकत घेतलेली नसून तिला एका खास चाहत्यानं ती भेट दिली. ती व्यक्ती म्हणजे भारतरत्न गानकोकीळा स्वर्गीय लता मंगेशकर. दीदींचा आज पहिला स्मृर्तीदिन आहे. यानिमित्तानं विशाखानं त्यांच्याबरोबरची खास आठवण सर्वांबरोबर शेअर केली. विशाखानं आता महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो सोडला असला तरी कोरोनाच्या काळात हास्यजत्रेनं सर्वांचं मनोरंजन केलं होतं. त्या वेळी विशाखानं एका उर्दू गायिकेची भूमिका साकारली होती. जी पाहून स्वत: लता दीदींनी विशाखाचं कौतुक करत तिला खास भेट म्हणून साडी पाठवली होती.

‘बारामतीचं नामांतर करा’, पवारांवर निशाणा साधत शिवतारेंनी सांगितलं नवीन नाव!

बारामती मतदारसंघाचं नाव बदलावं अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते विजय शिवतारे यांनी केली आहे. बारामती मतदारसंघाचा विकास म्हणजे फक्त बारामती शहराचा विकास होतो का? असा प्रश्न शिवतारे यांनी उपस्थित केला आहे. पुरंदर, दौंड या विधानसभा मतदारसंघांचं काय? असंही शिवतारे यांनी विचारलं आहे.

बारामतीच्या विकासाच्या मुद्द्यावरून शिवतारे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पवार कुटुंबियांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. बारामती मतदारसंघांचं नाव बदलून पुणे दक्षिण करा, अशी मागणी विजय शिवतारे यांनी केली आहे.

नाना पटोलेंचं प्रदेशाध्यक्षपद जाणार? बाळासाहेब थोरातांचं काँग्रेस हायकमांडला स्फोटक पत्र

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातला वाद विकोपाला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून प्रदेशाध्यक्षांसोबत आपल्याला काम करणं शक्य नसल्याचं स्पष्ट केल्याची माहिती समोर येत आहे. विधानपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या पक्षीय राजकारणामुळे व्यथित झाल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

बाळासाहेब थोरात यांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे काँग्रेस हायकमांड नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

फक्त 300 रुपये रेंट देऊन राहा फ्लॅटमध्ये, ‘या’ राज्यात सुरू झाली स्कीम

या वर्षाच्या (2023) अखेरीस राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी आत्तापासूनच मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकारनं जनतेसाठी मोठी स्कीम आणली आहे. राजस्थान सरकारनं सरकारी फ्लॅट्स भाड्यानं देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या फ्लॅट्ससाठी दरमहा फक्त 300 रुपये भाडं आकारलं जाणार आहे. परवडणाऱ्या घरांच्या योजनेअंतर्गत बांधण्यात आलेले हे फ्लॅट असतील. भाडे कराराचा मसुदा अशा प्रकारे तयार केला जाईल की, संबंधित भाडेकरू 10 वर्षांनंतर घराच्या सध्याच्या किंमतीची उर्वरित रक्कम देऊन मालक होऊ शकेल. ‘टाइन्स ऑफ इंडिया’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

नागरी आणि गृहनिर्माण (UHD) विभागातील वरिष्ठ अधिकारी म्हणाले, “तीन लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेली कुटुंबं या योजनेसाठी पात्र आहेत. परवडणाऱ्या घरांच्या योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या अनेक मालमत्ता अनेक वर्षांपासून रिकाम्या आहेत. त्यांचा उपयोग करून राजस्थानमधील दुर्बल घटकांना सेवा देण्यासाठी ही योजना आहे.”

भारत पाकिस्तान पुन्हा आमने सामने, पहा संपूर्ण शेड्युल

क्रिकेट विश्वात लवकरच महिला टी 20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. 10 फेब्रुवारी पासून दक्षिण आफ्रिकेत महिला वर्ल्ड कपला प्रारंभ होणार असून यात भारताचा पहिलाच सामना हा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होईल. त्यामुळे पाकिस्तानला पुन्हा क्रिकेटच्या मैदानात नमवण्याचा मौका भारताकडे असणार आहे.

10 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या दरम्यान महिला टी 20 वर्ल्ड कप खेळवला जाणार असून याचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत करण्यात आले आहे. यंदा वर्ल्ड कप स्पर्धेत 10 संघांचा सहभाग असून यांचे दोन ग्रुपमध्ये विभाजन करण्यात आले आहे.

टर्की पुन्हा हादरले! दक्षिण टर्कीतील कहरामनमारा प्रांतात भूकंपाचे जोरदार धक्के; मृतांची संख्या १३०० पार

टर्कीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. गेल्या २४ तासांतील हा दुसरा भूकंप आहे. या भूकंपाची तीव्रता ७.६ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली असून कहरामनमारा प्रांतातील एल्बिस्तान जिल्ह्यात हे धक्के बसले. यामुळे टर्कीमध्ये पुन्हा हाहाकार उडाला आहे. दरम्यान, भूकंपामुळे आतापर्यंत १३०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. तर पाच हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत.

“प्रत्येक नेता निवडणुकीचाच विचार करतो, आम्ही साधू-संत नाही”; नितीन गडकरींचं विधान

२०२३-२४ चा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारीला मांडला आहे. या अर्थसंकल्पात करात सवलत, मोफत अन्नधान्य आणि विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. यावर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. प्रत्येक नेता निवडणूक डोळ्यासमोर ठेवत असतो, आम्ही तेच करतोय. आम्ही राजकारणी आहोत, साधू-संत नाही, असं स्पष्टीकरण नितीन गडकरींनी दिलं आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी बोलत होते. तेव्हा, २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत नागरिकांना अर्थसंकल्पात दिलासा देण्याचा प्रयत्न केला? यावर विचारले असता गडकरींनी सांगितलं, “प्रत्येक नेता निवडणूक डोळ्यासमोर ठेवत असतो, आम्ही तेच करतोय. आम्ही राजकारणी आहोत, साधू-संत नाही. आम्ही पूजा-पाठ करण्यासाठी नव्हे, तर निवडणूक जिंकण्यासाठी आलो आहोत. चांगले काम केलं, तर निवडणूक जिंकू. जो चांगलं काम करेल, लोकं त्यालाच निवडून देतात. दक्षिणेतील राज्यात मोफत वीज दिली जाते. त्यामुळे तोटा किती होतो, हे पाहिलं जात नाही.”

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.