महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं अखेर पुण्यात एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केलीय. स्वप्नील लोणकर असं या तरुणाचं नाव आहे. तो अथक परिश्रम घेऊन एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला. पण उत्तीर्ण होऊन दीड वर्षे झाले तरी त्याला लोकसेवा आयोगाने नियुक्ती दिली नाही. अखेर नैराश्यातून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं.
दरम्यान, उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न झाल्यानं नाशिकमध्ये या विरोधात 19 जून रोजी आंदोलनही झालंय. स्पर्धा परीक्षांची जीव तोडून तयारी करणाऱ्या आणि त्यात यश मिळवणाऱ्या तरुणांचा संघर्ष काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. 2019 ला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवेच्या परीक्षेचा निकाल 19 जून 2020 ला लागला. त्याला 1 वर्षे होऊन गेलं, तरीही अजून या निकालात निवड झालेल्या विद्यार्थ्यांची अजूनपर्यंत नियुक्तीच झालेली नाही. निवड झालेल्या तरुणांच्या नियुक्त्या रखडल्याने अखेर या भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा संयम संपल्याचं चित्र नाशिकमध्ये दिसलं. या ठिकाणी निवड झालेल्या तरुणांनी ‘मी तहसीलदार, तरीही मी बेरोजगार’ असा फलक हातात धरुन प्रशासनाच्या या गोंधळाचा निषेध केलाय.
लोकसेवा आयोगाने 2020 या वर्षात घेतलेल्या राज्यसेवा परीक्षेत निवड झालेल्या तरुणांनी आज (19 जून) नाशिकच्या शासकीय विश्रामगृह परिसरात राज्य सरकार विरोधात आंदोलन केलं. ‘मी तहसीलदार तरीही मी बेरोजगार’ अशा आशयाचं फलक घेऊन त्यांनी या दिरंगाईबद्दल आपली नाराजी व्यक्त केली.
जवळजवळ 413 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे करत या नियुक्ती सरकारने पुढे ढकलल्या, असा आरोप या तरुणांनी केलाय. मात्र सर्व निकाली लागूनही आम्हाला नियुक्ती का दिली जात नाहीये? असा सवाल हे भावी अधिकारी सरकारला विचारत आहेत.