अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या निर्णयानुसार भारतातील प्रादेशिक भाषेतून अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचं शिक्षण देण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाची परवानगी मिळाल्यानंतर मातृभाषेतून अभियांत्रिकी शिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठ आणि पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्या टप्प्यात या अभ्यासक्रमांची सुरुवात होणार आहे. मुंबई विद्यापीठानं बैठकीत याबाबत निर्णय घेतला.
पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मुंबई विद्यापीठानं देखील मराठी भाषेतून अभ्यासक्रम सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. मंगळवारी मुंबई विद्यापीठाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्येही मराठीतून अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे.
मुंबई आणि पुण्यातील महाविद्यालयातून अभियांत्रिकीचं मराठी भाषेतून शिक्षण सुरु करण्यात आलं आहे. मराठीतून अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. इंग्रजीतून अभ्यासक्रम शिकवला जात असल्यानं अनेक विद्यार्थी अभियांत्रिकीला प्रवेश घेण्यास टाळाटाळ करायचे मात्र, भाषेची अडचण दूर झाल्यानं प्रवेशाची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
अखिल बारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं पहिल्या टप्प्यात आठ प्रादेशिक भाषांमधून अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम सुरु करण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये मराठी, हिंदी, तामीळ, तेलुगु, गुजराती, कन्नड, मल्याळम या भाषांचा समावेश आहे.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढावेत म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक हुशार विद्यार्थी इंग्रजी भाषेच्या भीतीमुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश घेत नाहीत. त्यांना या निमित्तानं मातृभाषेतून अभियंता होण्याची संधी निर्माण झाली आहे.
मातृभाषेतून अभियांत्रिकीचे अभ्यासक्रम सुरु करावेत म्हणून एआयसीटईकडे 500 अर्ज दाखल झाले आहेत. विद्यार्थी त्यांच्या मातृभाषेतून एखादा विषय शिकल्यास तो चांगल्या प्रकारे समजून घेतो, असं एआयसीटीईचे चेअरमन अनिल सहस्त्रबुद्धे यांनी म्हटलं. पुढील काळात आणखी भारतीय भाषांमध्ये अभियांत्रिकी शिक्षण सुरु होणार आहे.