तमाम नागपूरकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री पोद्दारेश्वर राम मंदिर येथून रामनवमी निमित्त भव्य शोभयात्रा ही केवळ नागपुरात नव्हे तर विदर्भासह लगतच्या राज्यात देखील प्रख्यात आहे.कोरोना महासाथीच्या तीन वर्षांनंतर ही यंदा रामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रा निघाली. यावेळी राज्याचे उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, असे अनेक मान्यवर उपस्थित झाले होते.
श्री पोद्दारेश्वर राम मंदिराच्या स्थापनेला 4 मार्च रोजी 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने श्री पोद्दारेश्वर राम मंदिर ट्रस्टच्या वतीने शताब्दी वर्ष साजरे करण्यात आलं.यंदाचे मुख्य आकर्षण म्हणजे शोभायात्रेसाठी आकर्षक गजरथ साकारण्यात आला आहे. ज्यामध्ये श्री रामचंद्राच्यासह लक्ष्मण सीता हनुमंत यांची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे.
या शोभायात्रेत एकूण 85 चित्ररथ, विविध धार्मिक कार्यक्रम, कलशधारी महिला, शंख पथक, ढोल ताशे पथक होतं.पारंपारिक वेशभूषा साकारलेले कलाकार, राम लक्ष्मण,सीता हनुमंत, यांच्या वेशभूषेत बाल गोपाल अशी बहुरंगी अशी भव्य शोभायात्रा शहरात निघाली.पोद्दारेश्वर राम मंदिराच्या वतीने राम नवमी निमित्त निघणाऱ्या शोभायात्रेला यंदा 57 वर्षे पूर्ण होत आहे. तब्बल तीन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुनश्च एकदा ही शोभायात्रा थाटामाटात शहरातील विविध भागात निघाली.ही शोभायात्रा नागपूरच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि राष्ट्रिय एकात्मतेचे प्रतीक बनली आहे. सर्व समाजबांधव या शोभायात्रेत सहभागी होऊन आपले योगदान देत बंधुभाव,एकात्मता, प्रेम ही भावना जपत अतिशय शिस्तीने हा उत्सव साजरा करण्यात येत असतो.यंदाच्या शोभायात्रेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे 501शंख वादक, 108 मंगळकलशधारी महिला, महिला ढोल ताशा पथक, 85 चित्ररथ, लोकनृत्य, ध्वजधारक, अनेक पौराणिक प्रसंग, फटाका शो, असे विविध आकर्षक कार्यक्रमाचा समावेश यामध्ये करण्यात आला.