औरंगाबाद विमानतळावर गाडीत बसून अल्पोपहार घेतानाचा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा व्हिडीओ समोर आला आहे. कोरोनाच्या संकट काळात राज्याची आरोग्य व्यवस्था सांभाळताना राजेश टोपेंच्या स्वतःच्या आरोग्याची मात्र हेळसांड होते की काय, अशी शंका कोणाच्याही मनात येईल. कारण टोपेंना वेळी-अवेळी गाडीत बसून जेवण करावं लागत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
मुंबईला जाण्यासाठी निघालेल्या राजेश टोपे यांनी औरंगाबाद विमानतळावर गाडीत बसून अल्पोपहार घेतला. त्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. राजेश टोपे हे पर्याय नसल्याचंही सांगतात. त्यानंतर औरंगाबादहून ते मुंबईला विमानाने रवाना झाले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदा टोपे यांचं 1 ऑगस्ट 2020 रोजी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर राजेश टोपे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र, राज्यात कोरोनामुळे भीषण परिस्थिती असल्यामुळे राजेश टोपे यांनी संयमीपणे या दु:खाला पाठीमागे सारत कोरोनाविरोधाच्या लढाईत फ्रंट लाईनवर काम सुरु केलं होतं. आपल्या आईनेच कर्म करण्याची शिकवण दिली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. आईच्या मृत्यूनंतर तीन दिवसाच्याआत संपूर्ण अंत्यविधीचे सोपस्कार करुन कामाला लागलोय. माझे प्रेरणास्थान शरद पवार आहेत. ते सातत्याने काम करत आहेत. वयाच्या 80 व्या वर्षी ते लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. ते संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहेत. लोकांना प्रोत्साहन देत आहेत. लोकांची भीती घालवत आहेत”, असं राजेश टोपे म्हणाले होते.