पुणे : पुरंदर तालुक्यातील थोपटेवाडी येथे एका माळरानावर बेकायदा बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी यावर कारवाई करून दहा बैलगाडे तसेच बारा दुचाक्या जप्त केल्या आहेत. या प्रकारानंतर जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी घटनास्थळी भेट दिली असून आयोजकांवर गुन्हा दखल करण्यात आला आहे.
बोलाईदेवीच्या पायथ्यालागत असलेल्या माळरानावर बैलगाडा शर्यत सुरु होती. याविषयीची माहिती पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर यांना मिळाली. आपल्या गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीनुसार कैलास गोतपागर हे माळरानार गेले. त्यानंतर या ठिकाणी बैलगाडा शर्यत सुरू असल्याचे त्यांना आढळून आले.
त्यानंतर बैलगाड्यांच्या शयर्तीदरम्यान पोलीस दाखल झाल्याचे समजताच स्पर्धक आणि प्रेक्षकांनी बैलांना तिथेच सोडून पळ काढला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्या ठिकाणाहून दहा बैलगाडे तसेच 12 दुचाक्या जप्त केल्या. हे सर्व बैलगाडे आणि दुचाक्या सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.
हा प्रकार समोर येताच पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर यांच्यानंतर जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हेसुद्धा घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांवर गुन्हा दखल करण्यात आला आहे. तसेच आयोजकाबरोबरच जागेच्या मालकाचीसुद्धा चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली.