रुग्णांच्या भेटीसाठी गर्दी करणाऱ्या नातेवाईकांना आवरण्यासाठी नाशिक महापालिका आयुक्तांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांना जेवण देण्याच्या बहाण्याने किंवा इतर कारणांसाठी नातेवाईक येऊन भेटतात. हेच नातेवाईक शहरात सुपर स्प्रेडर ठरतात. नातेवाईक शहरात फिरत असल्याने कोरोना संसर्ग वाढत असल्याचा निष्कर्ष महापालिकेने काढला आहे. नाशिकमध्ये कोरोना संसर्ग वाढत असून रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.
सुरुवातीला एक हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. मात्र दंड करुनही ऐकले नाही तर थेट गुन्हे दाखल केले जावेत, असे आदेश नाशिक महापालिका आयुक्तांनी काढले आहेत. नाशिक शहरातील डॉ. झाकीर हुसैन, बिटको रुग्णालयांत कोरोना बाधित रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईक गर्दी करत असल्याचं वारंवार समोर येत आहे.
दुसरीकडे, मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात ये-जा करणारे रुग्णांचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी व्हायरस प्रोटेक्शन प्रेशराईज चेंबरची’ उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांचे कोणत्याही विषाणूपासून (Virus) संरक्षण होईल. हे देशातील पहिले व्हायरस प्रोटेक्शन प्रेशराईज चेंबर आहे. वैद्यकीय शिक्षण संचलनालयाचे संचालक डॉ तात्याराव लहाने यांच्या हस्ते या चेंबरचे उद्घाटन करण्यात आले. हा प्रयोग वैद्यकीय क्षेत्रातील मोठी क्रांती मानली जात आहे.
कोरोनाबधित किंवा इतर कोणत्याही विषाणूबाधित रुग्णापासून विषाणू संसर्ग हा आरोग्य कर्मचारी, रुग्णाचे नातेवाईक यांना होऊ नये, यासाठी या आयसोलेटेड चेंबर्सची निर्मिती जे.जे. रुग्णलयाच्या सर्जरी डिपार्टमेंटच्या डॉक्टरांच्या टीमने केली आहे. या चेंबरमध्ये रुग्णावर सोनोग्राफीपासून व्हेंटिलेटरवर लावणे, इतर तपासणी व उपचार योग्य खबरदारी घेऊन करता येतात. तसेच रुग्णाला एका जागेवरून दुसऱ्या जागी नेताना सुद्धा संसर्गाची शक्यता इतरांना कमी असते. प्रायोगिक तत्वावर हे चेंबर मुंबईतील रुग्णलयात वापरण्यात येणार असून भविष्यात याची संख्या वाढवली जाऊ शकते.