सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळख असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून क्लार्क केडरमधील ज्युनिअर असोसिएटस पदावरील भरती प्रक्रियेबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. स्टेट बँकेत तब्बल 5 हजार पदांसाठी भरती होणार आहे. बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात.
अर्ज कुठे करायचा ?
स्टेट बँकेच्या क्लार्क केडरमधील ज्युनिअर असोसिएटस (कस्टमर सपोर्ट आणि सेल्स) पदासाठी उमेदवार 17 मेपर्यंत अर्ज करु शकतात. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी sbi.co.in, bank.sbi/careers या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
काय आहे पात्रता
ज्युनिअर असोसिएटस पदासाठी अर्ज करणारा उमेदवार भारत सरकार आणि राज्य सरकारच्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर झालेला असणं आवश्यक आहे. उमेदवाराचं वय 20 वर्ष ते 28 वर्षांदरम्यान असणं गरजेचे आहे.
कशी असेल निवड प्रक्रिया
ज्युनिअर असोसिएटस पदावर उमेदवारांची निवड करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं पूर्व आणि मुख्य परीक्षा घेण्यात येईल. अर्ज करताना उमेदवार जी प्रादेशिक भाषा निवडतील त्या भाषेमध्ये परीक्षेचे आयोजन केले जाईल. पूर्व परीक्षा 1 तासाची असेल. यामध्ये इंग्रजी भाषा, तार्किक क्षमता, गणितीय क्षमता यासंबंधी 100 प्रश्न असतील. ही परीक्षा 100 गुणांसाठी होईल आणि 0.25 गुण चुकीच्या उत्तरासाठी वजा केले जातील. पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची मुख्य परीक्षा घेतली जाईल.
ज्युनिअर असोसिएटस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 750 रुपये फी भरावी लागेल. तर, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना कोणतीही फी भरावी लागणार नाही.
किती मिळेल पगार
स्टेट बँकेच्या ज्युनिअर असोसिएटस पदावर निवड झालेल्या उमेदवारांना 17 हजार 900 ते 47 हजार 920 पगार मिळेल. उमेदवारांनी एसबीआयने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचना वाचल्यानंतरच अर्ज सादर करावा.