अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला कोरोनाची लागण झाली आहे. तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना छोटा राजनचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याला उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल केले आहे. तब्बल 26 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकणी गँगस्टर छोटा राजनसह तिघा जणांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जानेवारी महिन्यात ही शिक्षा सुनावली होती.
पनवेल येथील एक बिल्डर नंदू वाजेकर यांनी पुण्यात एक जागा डेव्हलपमेंट करण्यासाठी घेतली होती. ही जागा वाजेकर याला परमानंद ठक्कर या एजंट ने दिली होती. या बदल्यात वाजेकर याने परमानंद याला दोन कोटी रुपये दिले होते. मात्र, यानंतर ही आपला व्यवहार पूर्ण झाला नसल्याचं कारण पुढे करत परमानंद याने पैसे मागायला सुरुवात केली होती. जास्त पैसे मिळावे म्हणून परमानंद ठक्कर याने या व्यवहारात गँगस्टर छोटा राजन याला मध्यस्थी करायला सांगितली होती. त्यामुळे छोटा राजन याने बिल्डर वाजेकर याला फोन करून धमकावलं होत आणि प्रकरण मिटवायला सांगितलं होतं. यामुळे अखेर वाजेकर याने पोलिसात तक्रार दाखल केली होती. 2015 सालातील हे प्रकरण आहे.
या प्रकरणात छोटा राजन सोबत त्याच्या इतर तीन साथीदारांना दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली आहे. छोटा राजन याच्यासह सुरेश शिंदे, सुमित म्हात्रे आणि अशोक निकम यांनाही दोन वर्षे शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड अशी ही शिक्षा सुनावली आहे. पाच हजार रुपये न भरल्यास त्याबदल्यात सश्रम कारावासात वाढ होणार आहे.
या प्रकरणात मोक्का कायदा आणि खंडणीसाठी धमकावणे, ट्रेस पासिंग बाबत कलम लावण्यात आली होती. मात्र, राजन याच्या विरोधात मोक्का अॅक्ट सिद्ध झाला नाही. केवळ खंडणीच्या उद्देशाने धमकावणे हेच सिद्ध झाल्याने त्याला दोन वर्षे शिक्षा सुनावण्यात आली आहे. छोटा राजन याच्या विरोधात सुमारे 71 खटले प्रलंबित आहेत. त्यापैकी आतापर्यंत चार गुन्ह्यांचा निकाल लागला आहे आणि या चारही गुन्ह्यात छोटा राजन याला दोषी ठरवून त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. छोटा राजन याला आतापर्यंत सुनावण्यात आलेल्या शिक्षा अशा आहेत.