देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भाची आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या करुणा शुक्ला यांचे सोमवारी रात्री कोरोनामुळे निधन झाले. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगढच्या रामकृष्ण केअर या रुग्णालयात करुणा शुक्ला यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने करुणा शुक्ला यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे करुणा शुक्ला भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये दाखल झाल्या होत्या.
करुणा शुक्ला यांच्या निधनानंतर छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, आरोग्यमंत्री टीएस सिंहदेव यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. माझी काकी करुणा शुक्ला या आपल्यामध्ये राहिल्या नाहीत. निष्ठूर कोरोनाने त्यांना आपल्यापासून हिरावले. राजकारणापलीकडे आमचे त्यांच्याशी कौटुंबिक संबंध होते. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि आम्हाला त्यांचा विरह सहन करण्याची ताकद देवो, असे ट्विट मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले.