भारताची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊल सुरू आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं असून त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. त्याचवेळी मुंबईकरांना भेडसावणारा एक विचित्र प्रश्न म्हणजे संततधार पावसात धुतलेले कपडे कसे सुकवायचे? अशा परिस्थितीत मुंबईकरांनी कपडे सुकवण्याचा अजब जुगाड केला आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुंबई लोकलच्या डब्यामध्ये कपडे सुकायला टाकल्याचं पाहायला मिळतं.
दादर मुंबईकर नावाच्या इंस्टाग्राम पेजवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मुंबई लोकल ट्रेनच्या डब्यात कपडे सुकवण्यासाठी लटकलेले दिसत आहे. त्याचवेळी ट्रेनमध्ये प्रवासीही बसलेले दिसतात. लोकल ट्रेनमध्ये एक शाल, चादर आणि टॉवेल सुकविण्यासाठी रॉडवर टाकलेले दिसतात. व्हिडिओ शेअर करत ‘हे फक्त आपल्या मुंबईत घडू शकते ’ असं कॅप्शन दिलं आहे.
लोकल ट्रेनमध्ये कपडे सुकवण्याचा मजेदार व्हिडिओ ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर येताच तो व्हायरल झाला. या व्हिडिओवर अनेक लाइक्स आणि कमेंट्स येत आहेत. नेटिझन्स हा व्हिडिओ अतिशय मजेशीर असल्याचं म्हणत आहेत. त्याच बरोबर अनेकांनी कमेंट करत मुंबईकरांनी प्रत्येक कठीण प्रसंगासाठी ‘देसी जुगाड’ शोधल्याबद्दल कौतुकही केलं आहे.