गेल्या दोन महिन्यांतील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत करण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या (एनडीआरएफ) निकषाच्या दुप्पट ही मदत असून, राज्यातील सुमारे १५ लाख हेक्टर क्षेत्राला या निर्णयाचा लाभ होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
राज्यात गेल्या दोन महिन्यांत विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करून शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा केली होती. तसेच नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल यंत्रणेला देण्यात आले होते. मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.