राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आजही दिलासा मिळू शकला नाही. 100 कोटींची वसूली आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशमुख यांना आणखी 14 दिवस न्यायालयीन कोठडीत काढावे लागणार आहेत. देशमुख सध्या ऑर्थर रोड तुरुंगात आहेत. यापूर्वी मुंबईच्या विशेष न्यायालयानेही त्यांना दिलासा दिला नव्हता.
100 कोटींची वसुली आणि मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ईडीने 2 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांना अटक केली होती. मुंबईच्या विशेष न्यायालयाने 18 जानेवारी रोजी त्यांची डिफॉल्ट याचिका फेटाळून लावली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपप्रकरणी देशमुखांना दिलासा मिळू शकला नाही. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेमार्फत डिसेंबर 2020 ते मार्च 2021 दरम्यान बारमालकांकडून खंडणी वसुली करण्यात आली आहे. हा पैसा वाझेने देशमुखांना दिला होता. देशमुखांनी या पैशाचा वापर आपल्या व्यवसायासाठी केल्याचा आरोप ईडीने लावलेला आहे.
गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल.
देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहून हे आरोप केले होते.