जम्मू काश्मिरात अलिकडच्या काळात दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. या दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देत त्यांचा कडवा मुकाबला करण्याच्या हेतूने सुरक्षा दलांकडून विशेष अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत सुरक्षा दलांनी मागील 36 तासांत धडाकेबाज कारवाई करीत तिसरे एन्काऊंटर करण्यात यश मिळवले आहे. या अवधीत एकूण 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्यामुळे दहशतवादी संघटनांचे धाबे दणाणले आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये सध्या त्राल, अवंतीपोरा आणि हरदुमीर परिसरात सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना त्रालमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. याआधी आजच शोपियानमध्येही सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. तसेच पुलवामा येथे दोन दहशतवादी ठार करण्यात आले.
गेल्या काही दिवसांत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात वेगाने कारवाई केली आहे. श्रीनगरच्या इदगाह परिसरात दहशतवाद्यांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला, तेव्हापासून वेगवेगळ्या भागांत सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. तेथे एक दहशतवादी मारला गेला होता. त्या घटनेनंतर आतापर्यंत 5 दहशतवादी मारले गेले आहेत. लष्कराकडून अजूनही अनेक भागांत शोधमोहीम सुरू आहे. त्राल, अवंतीपोरा आणि हरदुमीर भागात परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून दहशतवाद्यांना पकडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
या चकमकींव्यतिरिक्त सुरक्षा दलांना आणखी काही मोठे यश मिळाले आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी नुकतीच एक मोठी कारवाई केली. श्रीनगरमध्ये एका नागरिक आणि एका पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’च्या दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्या दहशतवाद्यांची कसून चौकशी केली जात आहे. संबंधित दहशतवाद्यांच्या चौकशीतून कश्मिर खोऱ्यातील इतर कट-कारस्थानांची मोठी माहिती मिळू शकते, असा अंदाज सुरक्षा दलांशी संबंधित वरिष्ठ सूत्रांनी वर्तवला आहे.