आज दि.२६ एप्रिलच्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…..

गरोदर वाघिणीला
जिवंत जाळले

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनविभागाअंर्गत मुकु टबन परिक्षेत्रातील मांगुर्ला नियतक्षेत्रातील राखीव वनकक्ष क्र . ३० मध्ये सकाळी गस्तीदरम्यान वनरक्षकाला वाघिणीचा मृतदेह आढळून आला. याठिकाणी नाल्याला लागूनच एक गुहा आहे आणि या गुहेचा वापर ही वाघीण करत होती. गुहेचे प्रवेशद्वार अतिशय छोटे आहे. स्थानिक शिकाऱ्यांनी हे पाहिले असेल आणि वाघिणीला गुहेत अडकवून ठेवण्यासाठी बांबू आणि इतर साहित्यासह त्यांनी गुहेच्या प्रवेशद्वारावर आग लावली. ती वाघीण मेली आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी त्यांनी तीक्ष्ण हत्यारांनी तिच्या शरीरावर जखमा केल्या. ती मेल्याची खात्री केल्यानंतर तिचे दोन्ही पंजे कापून नेले.

निवडणूक आयोग कोरोनाच्या
लाटेला जबाबदार : उच्च न्यायालय

देशातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयाने आज एक अत्यंत मोठी व महत्वाची टिप्पणी केली आहे. देश कोरोनाशी लढा देत असतांना ही राजकीय पक्षांना मोर्चा घेण्यास परवानगी दिल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगावर टीका केली आहे. तसेच, निवडणूक आयोग कोरोनाच्या लाटेला जबाबदार असून, आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं म्हणत न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे.

प्रत्येकाला कोरोनाची लस
मोफत मिळाली पाहीजे : राहुल गांधी

करोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. रुग्णालयात बेड्स नाहीत, ऑक्सिजन नाही अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडू लागला आहे. वेळीच उपचार मिळत नसल्याने अनेक रुग्णांना प्राणाला मुकावं लागत आहे. तसेच करोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्याचबरोबर करोना लसींच्या किंमतींवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात वाद सुरु झाला आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. करोनाची लस मोफत मिळाली पाहीजे असं ट्विट त्यांनी केलं आहे

कर्नाटकामध्ये उद्यापासून
१४ दिवसांचा लॉकडाऊन

करोनापुढे देशात हतबलता दिसून येत आहे. करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. तरीही दिवसेंदिवस हा आकडा वाढत असल्याने प्रशासकीय यंत्रणांवर ताण वाढू लागला आहे. काही राज्यांनी करोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. तर काही राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत. आरोग्य यंत्रणेवरील ताण दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आता कर्नाटक सरकारनेही लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून (२७ एप्रिल) १४ दिवसांचा लॉकडाऊन राज्यात असणार आहे. उद्या रात्रीपासून निर्बंध लागू होणार आहेत.

मला तर अजित पवारच मुख्यमंत्री
वाटतात : प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या करोना कालावधीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री कुठेच आणि कोणाशीही चर्चा करताना दिसत नाही. मला तर अजित पवारच मुख्यमंत्री वाटतात. जे काही जाहीर करायचं असतं, ते अजित पवारच जाहीर करतात. अजित पवार मला डी फॅक्टो मंत्री वाटतात असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहेत.

विडी कामगाराने केली
दोन लाख रुपयांची मदत

केरळमधील कुन्नूरमधून समोर आली आहे. येथील एका विडी कामगाराने मुख्यमंत्री आपत्कालीन मदत निधीसाठी तब्बल दोन लाख रुपयांची मदत केली आहे. एवढा निधी दिल्यानंतर या कामगाराच्या खात्यात केवळ ८५० रुपये शिल्लक उरले आहेत. हा विडी कामगार नक्की कोण यासंदर्भातील माहिती उघड करण्यात आली नसली तरी मुख्यमंत्र्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वजचजण त्याचं कौतुक करताना दिसत आहेत.

नोमडलँड सिनेमाला
यंदाचा ऑस्कर

सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ९३ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदा ‘नोमडलँड’सिनेमाने बाजी मारली आहे. या सिनेमाने तीन पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. या सिनेमासाठी अभिनेत्री फ्रान्सिस मॅकडॉर्मंड हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर क्लोई जाओ यांना दिग्दर्शनासाठी पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर ‘नोमडलँड’ या सिनेमाने सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार पटकावत 2021 सालातील ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरलं आहे.

बगदादमध्ये रुग्णालयाला
आग लागून ८२ जण ठार

इराकची राजधानी असलेल्या बगदादमध्ये एका रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आग लागून ८२ जण ठार तर इतर ११० जण जखमी झाले आहेत, अशी माहिती इराकच्या अंतर्गत कामकाज मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही आग लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

मायक्रोसॉफ्ट आणि गुगल
करणार भारताला मदत

आंतरराष्ट्रीय पातळीवरुन भारताकडे मदतीचा ओघ सुरु झाला असतानाच आता मायक्रोसॉफ्ट आणि गुगल जगातील दोन बलाढ्या कंपन्याही भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहे. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सत्या नाडेला आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्विट करु तशी माहिती दिली. भारतामधील सध्याची परिस्थिती पाहून माझे हदय विदीर्ण झाले आहे. अमेरिकेने भारताला मदत करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी आभारी आहे.

विश्वासघात झाला नसता तर
चित्र वेगळे असते : चंद्रकांत पाटील

जनतेने आम्हाला राज्यकर्ते म्हणून निवडून दिलं. पण विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. कोविडचा काळ आहे. कोरोनाचं प्रमाण वाढत आहे. कोविड आहे काय हवं ते करून घ्या, असंही करून चालणार नाही. शेवटी लोकांनी तुम्हाला अंकूश शक्ती म्हणून निवडून दिलं आहे. आम्हाला राज्यकर्ते म्हणूनच निवडून दिलं होतं. विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो. विरोधकांची भूमिका ही अंकूश शक्ती असते. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही घटना आम्ही खपवून घेणार नाही, असं पाटील म्हणाले.

कोरोनाचा फटका, 9 कंपन्यांच्या
मार्केट कॅपमध्ये घसरण

कोरोना विषाणू संसर्गानंतर भारतातील जवळपास प्रत्येक क्षेत्राला मोठा फटका बसलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज तीन लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना काळात सॅनिटायझर, साबण आणि सफाईचं साहित्य मोठ्या प्रमाणावर विकलं जात आहे. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाचा काही कंपन्यांना देखील फटका बसत आहे. देशातील साबण निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी हिंदुस्थान युनिलीव्हर कंपनीला तब्बल 34 हजार 918 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

कोरोना विरुद्धच्या लढाईत
भारतीय नौदलाचं योगदान

कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सर्व यंत्रणांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. इंडियन आर्मी, एअरफोर्स नंतर इंडियन नेव्हीदेखील कोरोना विषाणू विरोधातील लढाईत उतरली आहे. भारतीय नौदलानं देखील कोरोना विषाणू संसर्गात नागरिकांचं रक्षण करण्यासाठी योगदान देण्यास सुरुवात केली आहे. इंडियन नेव्हीच्या साऊदर्न नावल कमांडनं कोची येथून ऑक्सिजन केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप बेटांवर पोहोचवला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. कोची ते लक्षद्वीप बेटे यातील अंतर 500 किमी आहे.

SD Social Media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.