कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सर्व यंत्रणांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. इंडियन आर्मी, एअरफोर्स नंतर इंडियन नेव्हीदेखील कोरोना विषाणू विरोधातील लढाईत उतरली आहे. भारतीय नौदलानं देखील कोरोना विषाणू संसर्गात नागरिकांचं रक्षण करण्यासाठी योगदान देण्यास सुरुवात केली आहे. इंडियन नेव्हीच्या साऊदर्न नावल कमांडनं कोची येथून ऑक्सिजन केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप बेटांवर पोहोचवला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. कोची ते लक्षद्वीप बेटे यातील अंतर 500 किमी आहे.
35 ऑक्सिजन सिलेंडर लक्षद्वीपला पोहोचवले
भारतीय नौदलाच्या आयएनएस शारदा या लढाऊ जहाजावरुन 35 ऑक्सिजन सिलेंडर, रॅपिड अँटिजेन टेस्ट किट, पीपीई किट आणि इतर साहित्य लक्षद्वीपला पोहोचवण्यात आले. लक्षद्वीप बेटांवर सध्या 1200 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. लक्षद्वीपची लोकसंख्या 64 हजार 429 इतकी आहे.
कोचीमध्ये लक्षद्वीपच्या रुग्णांसाठी बेड राखीव
संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार कोचीमध्ये 10 आयसीआयू बेड लक्षद्वीपच्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. नावल एअर स्टेशन आयएनएसवर देखील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास रुग्णांना हलवण्यासाठी हेलिकॉप्टरचा देखील वापर केला जाऊ शकतो.
कोरोना विषाणू संसर्गावर मात करण्यासाठी भारताची प्रमुख संरक्षण दलं म्हणजेच इंडियन आर्मी, इंडियन एअर फोर्स आणि इंडियन नेव्ही कार्यरत असल्याचं चित्र आहे. ऑक्सिजन एक्स्प्रेस साठी इंडियन आर्मीसाठी राखीव असलेले रॅक वापरले जात आहेत. तर, भारतीय हवाई दलाच्या मदतीनं रिकामे ऑक्सिजन टँकर्स एअरलिफ्ट केले जात आहेत