चिपळूण दौऱ्यात अधिकारी उपस्थित नसल्यानं भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला. व्यापाऱ्यांनी तक्रारीचा पाढा वाचल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन त्यांची शाळाच घेतली. मात्र, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करताना राणेंचा तोल गेल्याचंही दिसलं. राणेंचा जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलतानाचा हा व्हिडीओ सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
नारायण राणे जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले, “तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथं कोण आहे? इथं तुमचा एक तरी अधिकारी आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं, आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा.”
समोर जिल्हाधिकाऱ्यांनी सीईओ संबंधित ठिकाणी असल्याचं सांगितलं. त्यानंतर कोण सीईओ आहे, मला कुणीही भेटलं नाही असं सांगितलं. मी बाजारपेठेत उभा आहे. कोण आहेत सीईओ? मला दाखवा, असंही नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुनावलं.
नारायण राणे यांनी आपल्या दौऱ्या दरम्यान अधिकारी उपस्थित नसल्यानं जिल्हाधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. मात्र, असं करत असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचाही अनादर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोलत असताना त्यांनी एकेरी भाषेचा उपयोग करत तो सीएम बीएम गेला उडत असं उद्दाम भाष्य केलं. त्यामुळे यावरुन राणेंवर टीकाही होत आहे.
मुख्यमंत्री चौथ्या दिवशी कोकणात का आले ते सांगतो. काल साडे सहाला माझा फॅक्स आला. मी कोकणात येत असल्याचं कळवलं होतं. त्यानंतर त्यांनी पूरपरिस्थिती पाहण्याचा कार्यक्रम तयार केला. तेव्हा मातोश्रीचा दरवाजा उघडला. नाही तर बंद होता. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असतात तसे ते अॅडमिट होते. आज सकाळी त्यांना डिस्चार्ज झाला. तर ते डायरेक्ट चिपळूणमध्ये आले. काय मुख्यमंत्री? कसली संवेदना? ही परिस्थिती झाल्या झाल्या त्यांनी यायला हवं होतं. उभं राहून सर्व यंत्रणा कामाला लावायला हवी होती, असं ते म्हणाले. पाठांतर करून यायाचं आणि बोलायचं. कसला मुख्यमंत्री. या राज्यात मुख्यमंत्री नाही. प्रशासन नाही. अशी भयावह परिस्थिती आहे, अशी टीकाही त्यांनी केली.