नाशिक-भुसावळ-इगतपुरी मेमू एक्स्प्रेसचा आजपासून श्रीगणेशा

एक अतिशय गोड आणि नाशिकरांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवणारी बातमी. नाशिक-भुसावळ-इगतपुरी मेमू एक्स्प्रेसचा श्रीगणेशा आजपासून होत आहे. तर दुसरीकडे नाशिक-मनमाड मार्गावरच्या रद्द झालेल्या 18 रेल्वे गाड्या आजपासून पूर्ववत होत आहेत. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची सोय होणार आहे.

नाशिक-भुसावळ-इगतपुरी मेमू ही रेल्वे गाडी आठ डब्यांची असणार आहे. ही गाडी भुसावळ जंक्शनवरून सकाळी 7 वाजता मार्गस्थ होईल. त्यानंतर 7.26 ला जळगाव, 10.09 वाजता चाळीसगाव, 12.08 वाजता मनमाड, 01.23 वाजता नाशिक आणि त्यानंतर साधारणतः दुपारी 3 सुमारास ही गाडी इगतपुरी येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात सकाळी सव्वानऊ वाजता ही गाडी इगतपुरी येथून निघणार आहे. तर भुसावळवला ही गाडी सायंकाळी 05.10 वाजता पोहचेल, अशी माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली.

मुंबईत कळवा-दिवा दरम्यान रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे नाशिक मार्गावरच्या 18 रेल्वे काल 9 जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नागरिक आणि चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. एकीकडे एसटी बंद आहेत. दुसरीकडे महत्त्वाच्या रेल्वे बंद झाल्याने प्रवास करायचा तरी करा, असा सवाल प्रवासी करत होते. आत्या त्या रद्द झालेल्या गाड्या आज रविवारपासून पूर्ववत धावत आहेत. त्यामुळे तपोवन, पंचवटी, नंदीग्राम, जनशताब्दी या गाड्यांसह मनमाड-नाशिक मार्गावरच्या रद्द झालेल्या फेऱ्या आजपासून पुन्हा सुरू झाल्या आहेत.

नाशिक-कल्याण मेमू लोकल लवकरच सुरू होणार म्हणून चर्चेत असणारी नाशिक-कल्याण मेमू (मेन इलेक्ट्रिकल मल्टिपर्पझ युनिट) लोकलसेवा कधी सुरू होणार, अशी विचारणा आता नागरिकांमधून होत आहे. या रेल्वे सेवेला यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या नावाखाली ही मागणी बासनात गुंडाळण्यात आली. त्यानंतर ही निवडणूक झाल्यानंतर नव्या वंदे मातरम् मेमू लोकलची चर्चा सुरू झाली. यात दिवसांमागून दिवस सरत गेले. मात्र, नाशिकसाठी अतिशय महत्त्वाची असणारी मेमू लोकल काही सुरू झाली नाही. पुन्हा कालांतराने मेमू लोकलच सुरू होईल, अशी घोषणा रेल्वेने केली. या लोकलचा चाकरमान्यांपासून ते थेट विद्यार्थ्यापर्यंत साऱ्यांनाचा मोठा फायदा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.