आज दि.१० डिसेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

एसटी कर्मचाऱ्यांना
शेवटचा अल्टिमेटम

आता राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना शेवटचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली आहे. अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेऊन एसटी संपाबाबत राज्य सरकारची नेमकी भूमिका स्पष्ट केली. “महाराष्ट्रातल्या सगळ्या डीसींशी बोललो. त्यांच्याकडे कर्मचारी जाऊन सांगतायत की आम्हाला कामावर यायचंय पण काही लोकांकडून कामावर येऊ दिलं जात नाहीये. काही सांगतायत, आम्ही निलंबित आहोत म्हणून कामावर जाता येत नाहीये. त्यामुळे सगळ्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की एक संधी दिली पाहिजे”, असं अनिल परब यांनी सांगितलं.

CDS बिपिन रावत यांना अखेरचा सॅल्यूट,
अनेक देशांचे सैन्य प्रमुख उपस्थित

CDS बिपिन रावत यांचे Mi-17 V5 हेलिकॉप्टर कुन्नूर, तामिळनाडू येथे क्रॅश झाले. या अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि अनेक लष्करी अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला. सीडीएस बिपिन रावत ज्या हेलिकॉप्टरने वेलिंग्टन, तामिळनाडूला जात होते, त्या हेलिकॉप्टरमध्ये त्यांची पत्नी, दोन लष्करी अधिकारी, जवान आणि हेलिकॉप्टरच्या क्रूचे सदस्य उपस्थित होते. हेलिकॉप्टरमधील 14 जणांपैकी फक्त एक ग्रुप कॅप्टन वरुण सिंग जिवंत आहे, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जनरल रावत यांच्यासह सर्व शहीदांना देश श्रद्धांजली वाहत आहे.

चौकशी अहवाल येत नाही तोपर्यंत
कोणताही निष्कर्ष काढू नका

बिपिन रावत यांचा दुर्घटनेत मृत्यू झाल्यामुळे अनेकजण काही घातपात तर नाही ना अशी विचारणा करत आहेत. भारतीय हवाई दलाने अशी शंका उपस्थित करणाऱ्यांना फटकारलं असून चौकशी अहवाल येत नाही तोपर्यंत कोणताही निष्कर्ष काढू नका असं आवाहन केलं आहे. ८ डिसेंबर २०२१ ला झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी भारतीय हवाई दलाने चौकशी समिती स्थापन केली आहे. चौकशी जलदगतीने पूर्ण करत तथ्य समोर आणलं जाईल. तोपर्यंत मृत व्यक्तींची प्रतिष्ठा राखण्यासाठी खातरजमा नसलेल्या अफवा टाळाव्यात,” असं हवाई दलाने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मुंढेगाव आश्रमशाळेत
15 विद्यार्थी कोरोनाबाधित

नाशिक जिल्ह्यातील मुंढेगाव आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याची धक्कादायकबाब पुढे आली आहे. कोरोना लागण झालेल्या विद्यार्थ्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत. आदिवासी आश्रमशाळेत 300 विद्यार्थी आहेत. 15 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक
१५७.४५ अंशांनी वधारला

सकाळच्या सत्रात कमकुवत सुरुवातीनंतरही दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १५७.४५ अंशांनी वधारून ५८,८०७.१३ पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीने ४७.१० अंशांची भर घातली आणि तो १७,५१६.८५ पातळीवर स्थिरावला. सेन्सेक्समध्ये आयटीसीचा समभाग ४.६० टक्के तेजीसह आघाडीवर होता. त्यापाठोपाठ लार्सन अँड टुब्रो, एशियन पेंट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्र अँड महिंद्र, बजाज फायनान्स, डॉ रेड्डीज आणि इन्फोसिसचे समभाग तेजीत होते. व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.८० टक्क्यांपर्यंत वधारले.

धमकी पत्रात शब्दप्रयोग
क्लेशदायक : पेडणेकर

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याचं वृत्त आल्यानंतर त्यावर महापौरांनीच पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी पत्रातला मजकूर सांगताना महापौर किशोरी पेडणेकर यांच्या डोळ्यात अश्रू आले. पत्रात करण्याच आलेले शब्दप्रयोग क्लेशदायक असल्याचं यावेळी महापौरींनी सांगितलं. तसेच, “मला काहीही झालं तरी चालेल, पण माझ्या कुटुंबाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर सहन करणार नाही”, असं महापौरांनी ठणकावून सांगितलं आहे.

वानखेडे यांच्या कुटुंबीयांबाबत यापुढे
कोणतेही विधान करणार नाही : नवाब मलिक

केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांबाबत यापुढे कोणतेही विधान करणार नाही अशी हमी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्य न्यायालयात दिली आहे. गेल्या सुनावणीत न्यायालयाने कोणतेही वक्तव्य करणार नसल्याची लेखी हमी देऊनही त्याचे हेतुत: उल्लंघन केल्याप्रकरणी तुमच्यावर अवमान कारवाई का केली जाऊ नये अशी विचारणा करत नवाब मलिक यांनी खडसावलं होतं.
नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली असून यापुढे कोणतीही विधाने करणार नसल्याची पुन्हा एकदा हमी दिली आहे.

पुढील वर्षापासून वैद्यकीय
उपचार महाग होऊ शकतात

पेट्रोल-डिझेल, एलपीजी सिलेंडरपासून ते खाण्यापिण्यापर्यंतच्या, वाढत्या किमतीबरोबरच उपचार घेणेही महागडे होऊ शकते. खासगी रुग्णालये उपचाराचा खर्च वाढवण्याच्या मनस्थितीत आहेत. माध्यमांच्या वृतानुसार, पुढील वर्षापासून वैद्यकीय उपचार महाग होऊ शकतात वाढत्या खर्चात अपोलो आणि फोर्टिससह प्रमुख खाजगी रुग्णालये उपचार पॅकेजच्या दरात पाच ते दहा टक्के वाढ करण्याचा विचार करत आहेत. ही रुग्णालये रोखीने पैसे भरणाऱ्या रुग्णांसाठी किंमत वाढवण्याच्या विचारात आहेत.

हळदीचे भाव वाढले, प्रतिक्विंटल
८ हजार ७०० रुपयांचा दर

करोनोत्तर काळात वाढलेली हळदीची मागणी, या वर्षी करप्या रोगामुळे उत्पादन घसरण्याच्या शक्यतेने हळदीचे भाव वाढले असून हिंगोली बाजार समितीमध्ये प्रतिक्विंटल ८ हजार ७०० रुपयांचा दर मिळाला. हा दर आता नऊ हजारांपर्यंत वधारेल असे सांगण्यात येत आहे. बाजार समितीमध्ये चार हजार क्विंटल हळदीची आवक झाल्याचे सचिव नारायण पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्याचे पिवळे सोने असणाऱ्या हळदीचे दर वर्षी चढेच राहण्याची शक्यता आहे. हिंगोली जिल्ह्यात विदड्टरातूनही हळद येते.

एलॉन मस्क आता ‘जॉब’
सोडण्याच्या तयारीत

जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून एलॉन मस्क आता सर्वश्रुत झाला आहे. स्पेसएक्स कंपनीचा सहसंस्थापक आणि सीईओ असलेल्या एलॉन मस्कची संपत्ती आता अब्जावधी डॉलर्स झाली आहे. त्यामुळे तो जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरला आहे. त्याच्या संपत्तीमध्ये रोज नव्याने भर पडत असताना एलॉन मस्क आता ‘जॉब’ सोडण्याच्या तयारीत आहे की काय? अशी जोरदार चर्चा नेटिझन्समध्ये रंगू लागली आहे. आणि हे कोणत्याही ऐकीव माहितीवर नसून खुद्द एलॉन मस्कनं स्वत: ट्वीट करून ही इच्छा व्यक्त केली आहे. त्याला आता नव्या क्षेत्रात करीअर करायची इच्छा आहे.

मेक्सिकोमध्ये ट्रकच्या भीषण अपघातात
४९ जण ठार तर ५८ जण जखमी

मेक्सिकोमध्ये रात्री उशिरा ट्रकच्या अपघातामुळे हाहाकार उडाला. उत्तर अमेरिकेतील मेक्सिकोच्या चियापास राज्यातील दक्षिण-पूर्व मेक्सिकन शहराच्या गुटिएरेझजवळ ट्रक उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात ४९ जण ठार तर ५८ जण जखमी झाले आहेत. बचाव पथकाने ही माहिती दिली आहे. दक्षिण मेक्सिकोतील चियापास प्रांतातून जाणारा ट्रक वळणावळणावर उलटल्याने हा अपघात झाला. या ट्रकमध्ये शंभरहून अधिक लोक होते.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.