सध्या महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची संपूर्ण देशात चर्चा आहे. त्यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली ज्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पडले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आणि भाजपच्या मदतीने राज्यात सरकार बनवत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रात शिंदेशाही सुरू झाली असताना शेजारच्या राज्यात मात्र दुसऱ्या बड्या शिंद्यांना एक धक्का बसला आहे. ज्या ठिकाणी कधीही काँग्रेसची जीत झाली नाही त्या ठिकाणी भाजपचा पराभव करत काँग्रेसचा जय झाला आहे.
अर्थातच शेजारचं राज्य मध्य प्रदेश आणि ते शिंदे आहेत ज्योतिरादित्य. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यानंतर मध्यप्रदेशातील ज्योतिरादित्य शिंदे यांना त्यांच्या गडातच मोठा धक्का बसला आहे. महानगर पालिकेच्या निवडणुकीत तब्बल 58 वर्षांनंतर ग्वाल्हेरमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. मध्यप्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. यात भाजपला मोठा धक्का बसला आहेत. ग्वाल्हेरसोबतच भाजपचा पाचपैकी तीन ठिकाणी पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपच्या हातातून मुरैना, रीवा आणि कटनी या जागा निघून गेल्या आहेत. तर रीवा आणि मुरैनामध्ये काँग्रेसने बाजी मारली. तर देवास, रतलाममध्ये भाजप आणि कटनीमध्ये काँग्रेचा विजय झाला आहे.
दरम्यान, सर्वात जास्त मुरैना जागेच्या निकालाची चर्चा सर्वाधिक होत आहे. कारण त्याचे कारणही तसेच आहे. ग्वाल्हेर नंतर भाजपने मुरैनाची जागाही गमावली आहे. चंबल परिसरातील दोन मोठ्या महानगर परिषदांमध्ये भाजपला विरोधी पक्षाने धूळ चारली आहे. मुरैना महानगरपरिषदेत काँग्रेस उमेदवार शारदा सोलंकी यांनी विजय मिळवला आहे.
शारदा सोलंकी यांनी भाजपच्या मीना जाटव यांना तब्बल 10 हजार मतांपेक्षा जास्त मतांनी पराभूत केले आहे. हा भाजपला मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे. चंबल परिसरात भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांच्या मैदानात महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला आहे. मुरैना हे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचे क्षेत्र आहे. ते मुरैना भागाचे खासदार आहेत. केंद्रातील बलाढ्य मंत्र्यांमध्ये त्यांची गणना होते. मात्र, महापौरपदाच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पराभव झाला आहे.
ग्वाल्हेरमध्ये शिंदेंना मोठा धक्का –
मुरैनापूर्वी ग्वाल्हेर महापालिकेतही भाजपचा महापौरपदाच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. ग्वाल्हेर हा ज्योतिरादित्य शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. मात्र, तरीसुद्धा याठिकाणी भाजपच्या उमेदवार सुमन शर्मा यांचा दारूण पराभव झाला आहे. ग्वाल्हेर आणि मुरैना येथे गटबाजीमुळे भाजपचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे. 58 वर्षांनंतर ग्वाल्हेरमध्ये भाजपचा पराभव झाला आहे.