कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथून एक हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. येथील एका तरुण शेतकऱ्याने गावातील सरकारी विहिरीत उडी घेत आपल्या जीवनाचा शेवट केला आहे. संबंधित शेतकऱ्याने एक वर्षांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी नातेवाईकांनी त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचा जीव वाचला होता. पण यावेळी मात्र नियतीनं देखील डाव साधला आहे. संबंधित शेतकऱ्याने गावातील सरकारी विहिरीत उडी घेत आपलं जीवन संपवलं आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
काडगोंडा महादेव खडके असं आत्महत्या करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचं नाव असून ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता देखील आहेत. मृत खडके यांनी शनिवारी रात्री उशिरा घरातून बाहेर पडून गावातील सरकारी विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. सोमवारी दुपारी विहिरीत त्यांचा मृतदेह आढळल्यानंतर, हे प्रकरण उघडकीस आलं आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत काडगोंडा हे अल्पभूदारक शेतकरी असून त्यांच्याकडे 10 गुंठे इतकीच शेतजमीन आहे. पण मागील काही दिवसात आलेल्या सलग दोन महापुरामुळे त्यांच्या शेतीचं प्रचंड नुकसान झालं होतं. त्यांनी शेती आणि घरखर्चासाठी बँक आणि पतसंस्थेकडून काही कर्ज घेतलं होतं. तसेच काही ओळखीच्या लोकांकडून हातउसने पैसे देखील घेतले होते. त्यांच्यावर दोन लाखांहून अधिकचं कर्ज होतं. डोक्यावरील कर्जाची परतफेड कशी करायची? हा प्रश्न त्यांना सतावत होता.