आज दि.२१ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

राष्ट्रपती निवडणुकीत दुसऱ्या फेरीतही द्रोपदी मुर्मू आघाडीवर

राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत मतमोजणी सुरु आहे.

द्रौपदी मुर्मू यांना दुसऱ्या फेरीतही सर्वाधिक मतं मिळाली आहेत.

दुसऱ्या फेरीत आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि झारखंड या दहा राज्यांची मतमोजणी झाली , त्यात ते यशवंत सिन्हा यांच्या फार पुढे आहेत.

दुसऱ्या फेरीत राष्ट्रपती निवडणुकीत एकूण वैध मतदान 1886 झाले.

द्रोपदी मुर्मू यांना आतापर्यंत 1349 मतदान मिळाले असून त्या मताचं मूल्य 483299 इतकं आहे

यशवंत सिन्हा यांना 537 मतदान मिळाले तर मतांचं मूल्य 189876 इतकं आहे.

द्रोपदी मुर्मू ह्या देशाच्या पहिल्या आदिवासी समाजातील महिला राष्ट्रपती म्हणून विजयाच्या दिशेने आगेकूच करीत आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारकडून Good News; गणेशोत्सव आणि दहीहंडीवरील निर्बंध हटवले

गेल्या दोन वर्षांपासून राज्यावर कोरोनाचं सावट होतं. त्यामुळे राज्यात आयोजित केल्या जाणाऱ्या सण-उत्सव साजरा करण्यावर निर्बंध लावण्यात आले होते. दरम्यान आता राज्यात गणेशोत्सव आणि दहीहंडी धुमधडाक्यात साजरा होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. शिंदे आणि फडणवीस सरकारने गणेशोत्सव आणि दहीहंडीवरील निर्बंध हटवल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे या वर्षी नागरिकांना उत्साहात गणेशोत्सव आणि दहीहंडी साजरा करण्यात येणार आहे.  यासाठी एसटी प्रशासनाला जादा गाड्या सोडण्याचे निर्देश देण्यात आले असून परिवहन विभागास वाहतूक नियोजनाचे आदेश देण्यात आले आहे. प्रमुख महामार्गांवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून महामार्ग पोलिसांना ही सूचना जाहीर करण्यात आली आहे. राज्यात दहिहंडी आणि गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरे होणार असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात ईडीची सर्वात मोठी कारवाई, मुंबईतील घर जप्त

मुंबईतून एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात ईडीने खूप मोठी कारवाई केली आहे. ईडीने प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील घरावर जप्तीची कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा खूप मोठा झटका आहे. प्रफुल्ल पटेल यांची ईडीकडून याआधी दोनवेळा चौकशी झाली आहे. त्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. दोनवेळा केलेल्या चौकशीनंतर ईडीने जो तपास केला त्यानंतर पटेल यांच्याविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अतिशय जवळचे, निकटवर्तीय म्हणून प्रफुल्ल पटेल यांची ओळख आहे.

राऊत म्हणाले तो खासदार आमच्यासोबत, आता शिंदेंची घेतली भेट, शिवसेनेचा आणखी एक बुरूज ढासळणार?

शिवसेनेसमोरच्या अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार गेल्यानंतर आता खासदारांनीही उद्धव ठाकरेंना धक्का दिला आहे. शिवसेनेच्या 19 पैकी 12 खासदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. याचसोबत त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून लोकसभेतला शिवसेनेचा गटनेता आणि प्रतोदही बदलला. राहुल शेवाळे यांना गटनेता तर भावना गवळी यांना प्रतोद करण्याची मागणी पत्रात करण्यात आली. ही मागणी ओम बिर्ला यांनी मान्य केली.

शिवसेनेसोबत आता 7 खासदार शिल्लक असले तरी आता आणखी एका खासदाराने उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढवलं आहे, कारण शिवसेनेच्या खासदाराचा एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो समोर आला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांची भेट घेतली आहे. किर्तीकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शिंदे त्यांच्या निवासस्थानी गेले होते, पण तरीही या भेटीने चर्चांना उधाण आलं आहे.

‘पुरंदर’च्या वेढ्यात अडकल्या पवार कन्या! सुप्रिया सुळेंना 2024 ची परीक्षा कठीण जाणार?

महाराष्ट्रात मागच्या एका महिन्यात झालेल्या राजकीय भुकंपाचे हादरे अजूनही शिवसेनेला बसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 55 पैकी 40 आमदार आणि 19 पैकी 12 खासदार गेले आहेत. याशिवाय माजी नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकारीही शिंदे गटात सामील होत आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या बंडामुळे शिवसेनेच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेच, पण राष्ट्रवादी काँग्रेससमोरही अडचण निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यातून एकनाथ शिंदेंसोबत जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे 2024 साली सुप्रिया सुळेंसाठी बारामतीची जागा कठीण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बारामती लोकसभा मतदार संघामध्ये सहा विधानसभा मतदार संघ आहेत, ज्यात बारामती शहर, दौंड, इंदापूर, पुरंदर, खडकवासला आणि भोर यांचा समावेश आहे.

प्राजक्तची ‘संगीत देवबाभळी’ आता मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

मराठी रंगभूमीवर नाटकाची अनेक वर्षांची परंपरा आहे. मात्र गेल्या काही वर्षात रंगभूमीवरील नाटकांमध्ये काही महत्त्वाचे बदल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नाटकाच्या कथेपासून सादरीकरणापर्यंत अनेक गोष्टींमध्ये बदल करुन ते आणखी उत्तमरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहचवलं जात आहे. असंच एक नाटक म्हणून ‘संगीत देवबाभळी’.  भद्रकाली प्रॉडक्शनच्या ‘प्राजक्त देशमुख’ लिखित संगीत देवबाभळी या मराठी रंगभूमीवरील नाटकाचा या वर्षीपासून मुंबई विद्यापीठाच्या बी.ए. अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.  लेखक दिग्दर्शक प्राजक्त देशमुखनं स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.  युवा लेखक दिग्दर्शक प्राजक्त देशमुखनं यानं या नाटकातून नवीन पायंडा घालून दिला आहे. अनेक नाट्यस्पर्धेत पुरस्कार मिळवलेल्या या माईलस्टोन नाटकानं नवा विक्रम रचला आहे.

पावसाचं थैमान, पिकं सडली; वर्ध्यात कर्जबाजारी शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचं संकट

यंदाच्या वर्षी सुरुवातीला पावसाच्या दडीमुळे तर नंतर सततच्या मुसळधार पावसामुळे उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला. यामुळे तूर, कपाशी, सोयाबीन पिकांचे व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे.  शेत जमीन पाण्याखाली जाऊन जिल्ह्यातील 30.54 टक्के पिकांचे पूर्णत: नुकसान झाले. या अस्मानी संकटामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. 

जिल्ह्यात तूर, सोयाबीन, कापूस आदी पिकांचे उत्पन्न शेतकरी घेतात. आतापर्यंत जिल्ह्यात 97.62 टक्के म्हणजेच 4 लाख 2 हजार 119 हेक्टरवर विविध पिकांची लागवड झाली आहे. पण जुलै महिन्यात 19 रोजीपर्यंत झालेल्या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 22 हजार 826.7 हेक्टरवरील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात पाऊस लांबल्याने तब्बल चार हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. तर आता अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांवर तिबार पेरणी करावी लागणार आहे. 

अख्ख्या शिवसेनेला हायजॅक करण्याच्या तयारीत एकनाथ शिंदे; MP-MLA नंतर आता इथं ठेवलंय लक्ष

महाराष्ट्रातील राजकारणात उद्धव ठाकरे  विरुद्ध शिवसेनेमधील युद्ध दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. एकीकडे शिवसेना नेत्यांच्या बंडखोरीमुळे हळूहळू पक्ष तुटत आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा गट दिवसेंदिवस मजबूत होताना दिसत आहे. मात्र अद्याप शिंदेंनी मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही. शिवाय शिवसेनेच्या निवडणुकीच्या चिन्हावर नियंत्रण मिळवू शकले नाहीत. यादरम्यान मात्र शिंदे गटातही बंडखोरीची शक्यता ठाकरेंकडून व्यक्त केली जात आहे. अशावेळी एकनाथ शिंदे आता संपूर्ण शिवसेनेला हायजॅक करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे.

बुधवारी एकनाथ शिंदेंनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे. यात त्यांनी शिंदे गटाला शिवसेना पक्षाची मान्यता दिली जावी, अशी मागणी केली आहे. याशिवाय शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाणदेखील त्यांना द्यावं असं या पत्रात म्हटलं आहे.

स्कूल व्हॅन दारासमोर, आईकडून चॉकलेट घेऊन थेट तोंडात टाकलं; 6 वर्षीय चिमुरडीचा जागेवरच मृत्यू

कर्नाटकच्या उडपी जिल्ह्यात बुधवारी 6 वर्षांच्या एका चिमुरडीच्या गळ्यात चॉकलेट अडकल्यामुळे मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिमुरडी घराबाहेर उभ्या असलेल्या शाळेच्या व्हॅनमध्ये चढणार होती, तेवढ्यात हा भयंकर प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सामन्वी शाळेत जाण्यासाठी तयार नव्हती. आई-वडील आणि कुटुंबीयांनी तिला कसं-बसं करुन शाळेत जाण्यासाठी तयार केलं. आई सुप्रिता पुजारीने सामन्वीला शाळेत जाण्यास तयार करण्यासाठी एक चॉकलेटही दिलं. यादरम्यान शाळेची व्हॅन आली. वॅन पाहून सामन्वीने रॅपरसह चॉकलेट तोंडात टाकलं. त्यादरम्यान तिला श्वास गुदमरला आणि व्हॅनच्या दिशेने जात असतानाही रस्त्यात चक्कर येऊन खाली कोसळली.

‘आई-वडील कमी पडले’; ऑनलाईन सुसाइड नोट लिहित 23 वर्षीय युट्यूबरची आत्महत्या

देशात ज्या घटना समोर येत आहेत, त्यात आत्महत्येचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. विविध कारणांतून आत्महत्या केल्याच्या घटना समोर येत आहेत. नैराश्यामुळे अनेक तरुणाई, नागरिक टोकाचं पाऊल उचलताना दिसत आहे.सी धीना नावाच्या एका 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. तो युट्यूबर होता. तसेच ग्वाल्हेर येथील IIIT मध्ये शिक्षण घेत होता. त्याने तीन मजली इमारतीवरुन जीव देत आत्महत्या केली. सेल्फलो (SELFLO) नावाचे त्याचे युट्यूब चॅनेल होते. त्यात त्याने लिहून ठेवलेली सुसाइड नोट सापडली आहे. सुसाइड नोटमध्ये त्याने लिहिले आहे की, तो नैराश्यात होता. तसेच त्याला योग्यप्रकारे मार्गदर्शन करण्यास आईवडील अपयशी ठरल्याचे त्याने म्हटले. त्याचा मृतदेह सध्या उस्मानिया जनरल हॉस्पिटलमध्ये आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून त्याची सुसाइड नोट काढण्यात आली.

70 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतात येणार चित्ते! ‘या’ ठिकाणी पाहता येणार

जगातील सर्वांत वेगाने धावणारा प्राणी म्हणजे चित्ता सर्वांनाच माहिती आहे. मात्र, हा प्राणी 70 वर्षांपूर्वीच भारतातून नामशेष झाला होता. 1952 साली भारतातून चित्ता नामशेष झाल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यानंतर आता, म्हणजेच 70 वर्षांनी भारतात चित्ता आणला जाणार आहे. ऑगस्ट महिन्यात नामिबिया देशातून आठ चित्ते देशात आणण्यात येणार आहेत. नामिबियामध्ये जगातील सर्वाधिक चित्ते आहेत. ‘बीबीसी’नं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

सोनिया गांधींची ईडीकडून चौकशी सुरू

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही अखेर ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागलं आहे. सोनिया गांधी ईडीच्या कार्यालयात हजर झाल्या आहेत.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी राहुल गांधी यांच्यानंतर आता सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू झाली आहे. सोनिया गांधी दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या. ईडीच्या कार्यालयातील रुममध्ये 3 सदस्यांची टीम सोनिया गांधींची चौकशी केली.ज्या टीमने राहुल गांधींची चौकशी केली, तीच टीम आता नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनियांची चौकशी करत आहे. ED च्या अतिरिक्त संचालक मोनिका शर्मा या टीमचे नेतृत्व करत आहेत.

खासदार फोडणे शिंदे गटाला पडणार भारी, शिवसेना पुराव्यासह कोर्टात जाणार

आमदार फोडल्यानंतर शिवसेनेनं खासदारांचाही गट फोडला. या खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांनीही मान्यता दिली आहे. पण, आता शिवसेनेनं या निर्णयावरही जोरदार आक्षेप घेतला आहे. या निर्णयाविरोधात शिवसेनेला सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे. त्यामुळे कोर्टामध्ये शिवसेनेची आणखी एक याचिका दाखल होणार आहे.शिवसेनेचे 12 खासदार फोडल्यामुळे शिवसेनेमध्ये मोठी खळबळ उडाली. एवढंच नाहीतर दोनच दिवसात या बंडखोर खासदारांचा वेगळा गटही स्थापन झाला. शिंदे गट आणि भाजपच्या या खेळीवर शिवसेनेनं आता न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे.

चार वर्षात एसटी अपघातात १३२ प्रवाशांचा मृत्यू

मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये एसटी बसच्या अपघातात चालक, वाहकासह दहा प्रवाशाचा मृत्यू झाला. या अपघातात चालकाची चूक नसली तरीही एसटीत होणारे अपघात, वाहतूक नियमांना दिली जाणारी तिलांजली इत्यादी मुद्दे ऐरणीवर आले आहेत. गेल्या चार वर्षांत एसटीच्या बसगाड्यांच्या अपघातात १३२ प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. तर गेल्या तीन वर्षांमध्ये महामंडळाला अपघातग्रस्त एसटीतील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाईपोटी १०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम द्यावी लागली आहे.

अंत्यसंस्कार सेवांवरही जीएसटी लागू होणार? केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण

केंद्र सरकाने नुकत्याच जारी केलेल्या जीएसटी दरांनंतर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अन्नधान्यासह इतर महत्वाच्या वस्तूंवर जीएसटी लावण्यात आल्यामुळे सामान्य नागरीकांचे बजेट कोलमडले आहे. जीएसटीच्या सुधारित दरांनंतर केंद्र सरकारने अंत्यसंस्कार, स्माशानभूमी आणि शवागार सेवांवरही १८ टक्के जीएसटी लावल्याचा दावा करण्यात येत आहे. या दाव्यानंतर पीबीआय विभागाने स्पष्टीकरण देणारं ट्वीट केले आहे.

भारतीय क्रिकेटपटूंची शाही बडदास्त; एका फ्लाईटसाठी बीसीसीआयने खर्च केले तब्बल ३.५ कोटी रुपये

एकदिवसीय आणि टी २० क्रिकेट मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ वेस्ट इंडीजमध्ये दाखल झाला आहे. इंग्लंडमधील एकदिवसीय मालिका संपल्यानंतर मँचेस्टरहून भारतीय संघाने पोर्ट ऑफ स्पेनसाठी फ्लाईट घेतली होती. भारतीय संघाचा या १० तासांच्या विमानप्रवासाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एका चार्डर्ड फ्लाईटसाठी तब्बल ३.५ कोटी रुपये खर्च केले आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाने बीसीसीआय सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने मँचेस्टर ते पोर्ट ऑफ स्पेन या 10 तासांच्या प्रवासासाठी भारतीय खेळाडूंसाठी एक चार्टर्ड फ्लाईट बुक केली होती. या फ्लाईटमध्ये खेळाडूंसोबत त्यांच्या पत्नी आणि मैत्रिणींनीदेखील प्रवास केला.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.