२०२४ च्या निवडणुकीत मुख्यमंत्री कोण असणार? एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या चर्चेदरम्यान फडणवीसांचं थेट विधान
मागील काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी अलीकडेच मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. दुसरीकडे, अजित पवारांची सासरवाडी असलेल्या धाराशीवमध्ये ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असणारे त्यांचे बॅनर लागले आहेत. तर नागपुरात देवेंद्र फडणवीस यांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असणारा बॅनर लागला आहे.देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असणारे बॅनर लागले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली दिल्लीत सुरू आहेत, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या सर्व घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. २०२४ च्या निवडणुकीत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, त्यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढवू… असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
नांदेड जिल्ह्यात पुन्हा गारपीट, पिकांचे मोठे नुकसान
जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, मुखेड व लोहा तालुक्याला मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा व गारपिटीचा तडाखा बसला. यामध्ये केळी, हळदीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.मागील पंधरा दिवसांपासून अधून-मधून जिल्ह्याला गारपिटीचा सामना करावा लागला आहे. जनावरे जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आपत्ती व्यवस्थापन संदर्भात प्रशासनाशी फोनद्वारे संपर्क साधून शेतकऱ्यांच्या व्यथा पोहोचवल्या. गारपिटीने हळद, केळी, भुईमूग, ऊस, यासह आंबा, चिकू, मोसंबी संत्री पिकाचे मोठे नुकसान झाले.
“शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट महाविकास आघाडीसाठी सकारात्मक”
राज्यघटना आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट महाविकास आघाडीसाठी सकारात्मक ठरली आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाबाबत काँग्रेसचा विरोध नाही, असेही त्यांनी सांगितले.प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची दोन दिवसांपूर्वी भेट झाली होती. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंदर्भात ही भेट होती. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमधील प्रवेशाबाबत ही बैठक नव्हती, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी या दोन नेत्यांची भेट महाविकास आघाडीच्या दृष्टीने सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया दिली.
रुळांवर नव्हे पाण्यावर धावणार मेट्रो! पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा कंदील
केरळमध्ये आजपासून (२५ एप्रिल) देशातली पहिली वॉटर मेट्रो धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. देशातील ही पहिलीच मेट्रो असेल जी रुळांवर नाही तर पाण्यावर धावणार आहे. या प्रकल्पाद्वारे कोची आणि शहराच्या आसपासची बेटं जोडली जातील. हा प्रकल्प कोची आणि आसपासच्या लोकांसाठी आणि जगभरातील पर्यटकांना सुरक्षित आणि खिशाला परवडणारा प्रवास प्रदान करेल.या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात आठ इलेक्ट्रिक हायब्रिड बोटींसह वॉटर मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात हायकोर्ट-वायपिन टर्मिनल आणि व्यित्तला-कक्कनड टर्मिनल दरम्यान वॉटर मेट्रो धावेल. हायकोर्ट-वायपिन टर्मिनलदरम्यानच्या प्रवासासाठी प्रवाशांना २० रुपये तर व्यित्तला-कक्कनड टर्मिनल प्रवासासाठी प्रवाशांना ३० रुपये मोजावे लागतील. माफक दरात प्रवासी वातानुकूलित वॉटर मेट्रोने प्रवास करू शकतील.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात लखनऊच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखनऊ पोलिसांनीच योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठार करण्याची धमकी आली होती. त्यापाठोपाठ आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी देण्यात आली आहे. ANI या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.उत्तर प्रदेशमध्ये आपात्कालीन विभागाने ११२ हा नंबर मदतीसाठी जारी केला आहे. याच क्रमांकावर एका अज्ञाताने फोन केला होता. त्यावर मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लवकरच ठार करणार आहे असं या अज्ञात व्यक्तीने धमकावलं. ही धमकी येताच हा फोन घेणाऱ्या ऑपरेटरने पोलिसात तक्रार दिली आहे. ज्यानंतर कलम ५०६, कलम ५०७ आणि आयटी अॕक्ट कलम ६६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
चीन लवकरच टेलिकॉम क्षेत्रात नवीन पाऊल टाकणार?
संपूर्ण जगभरामध्ये आता ५ जी नेटवर्कची चर्चा सुरु आहे. जगातील अनेक देशांमध्ये ५जी नेटवर्क सुरु करण्यात आले आहे. भारतात सुद्धा रिलायन्स जिओ आणि एअरटेल या टेलिकॉम कंपन्यांनी अनेक शहरांमध्ये आपली ५जी सेवा सुरु केली आहे. मात्र आता चीन लवकरच या पुढील म्हणजे ६जी नेटवर्क लॉन्च करण्याची शक्यता आहे. ६जी वर चीनने काम करण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे. ४ जी नेटवर्कपेक्षा ५ जी नेटवर्क २० पटींनी वेगवान आहे. मात्र ६ जी लॉन्च झाल्यास हे सर्व रेकॉर्ड मोडीत काढणारे नेटवर्क असणार आहे.६ जी वायरलेस इंटरनेट हे स्पीड, स्पेक्ट्रम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सुरक्षा आणि ऊर्जा कार्यक्षमतेच्या बाबतीत आणखी प्रगती करेल अशी अपेक्षा आहे. सध्या अनेक देशांमध्ये ५ जी सुरु झाले असले तरी बरेच देश ५ जी नेटवर्कसाठी संघर्ष करत आहेत. यामध्ये चीन देश लवकरच ६ जी वायरलेस नेटवर्क लॉन्च करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. तसेच चीन अल्ट्रा फास्ट वायरलेस इंटरनेटचे टेस्टिंग देखील करत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. ज्याचा स्पीड १०० Gbps इतका आहे. असे झाल्यास हे नेटवर्क ५जी पेक्षा कितीतरी पटीने वेगवान असणार आहे.
पाकिस्तानी वंशाचे पत्रकार तारेक फतह कालवश
पाकिस्तानी वंशाचे कॅनडाचे पत्रकार तारेक फतह यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची पत्रकार मुलगी नताशा यांनी ही माहिती दिली. ‘पंजाबचा सिंह, भारताचा पुत्र, कॅनडाप्रेमी, सत्यवचनी, न्यायासाठी लढवय्या, वंचितांचा आवाज’ अशा शब्दांमध्ये नताशा यांनी आपल्या पित्याचे वर्णन केले. फतह हे अनेक भारतीय वृत्तवाहिन्यांवर राजकीय चर्चेमध्ये सहभागी होत असत.फतह यांचा जन्म १९४९ साली कराचीमध्ये झाला. ते १९८६ साली कॅनडाला स्थलांतरित झाले. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शोक व्यक्त केला आहे. फतह यांचे पत्रकार म्हणून तसेच लेखक म्हणून योगदान नेहमी स्मरणात राहील अशी प्रतिक्रिया संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबाळे यांनी ट्विटरवर व्यक्त केली.
‘मन की बात’मुळे लोकांचे मोदींशी भावनिक नाते!‘आयआयएम-रोहतग’चे सर्वेक्षण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय रेडिओ कार्यक्रमाची रविवारी (३० एप्रिल) शतकपूर्ती होत असून या कार्यक्रमामुळे लोकांचे मोदींशी भावनिक नाते निर्माण झाल्याची बाब आयआयएम-रोहतगच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.देशभर १०० कोटींहून अधिक लोकांनी हा कार्यक्रम एकदा तरी ऐकलेला असून २३ कोटी नागरिक नियमित श्रोते आहेत तर, ४१ टक्के हा कार्यक्रम अधूनमधून ऐकतात. महिन्याच्या अखेरच्या रविवारी मोदी किमान अर्धा तास ‘मन की बात’ कार्यक्रमातून लोकांशी संवाद साधतात. हा कार्यक्रम लोकांना प्रोत्साहन देणारा वाटतो. मोदींची संवाद साधण्याची कला लोकांना या कार्यक्रमाकडे अधिक आकर्षित करते, असे निष्कर्षही नोंदवण्यात आले आहेत.
अतिक, अशरफ हत्येच्या स्वतंत्र तपासाबाबत २८ एप्रिलला सुनावणी
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील कुख्यात गुंड, राजकारणी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर २८ एप्रिल रोजी सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली.वकील विशाल तिवारी यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यात २०१७ नंतर उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या १८३ चकमकींची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या खंडपीठाने या प्रकरणी तातडीने सुनावणी करावी, अशी विनंती तिवारी यांनी केली. त्यांनी खंडपीठास सांगितले, की त्यांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार होती. मात्र तिला सूचिबद्ध करण्यात आलेले नाही.
ड्रीम 11 वर रिक्षाचालक झाला नव्या कोऱ्या ऑडीचा मालक, खात्यात आले 1 कोटी
Dream 11 हा खेळ केवळ स्वप्ने दाखवत नाही तर हा खेळखेळणाऱ्यांना वास्तवात करोडपती बनवत आहे. बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील एका गावात राहणारा १७ वर्षीय मुलगा नितीश कुमार याने माय ड्रीमवर टीम बनवून एक कोटी दोन लाख आणि एक ऑडी कार जिंकली आहे.नितीश कुमार हा अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबातील असून तो कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्याच्या गावात ई-रिक्षा चालवतो.नितीश मागील तीन वर्षांपासून Dream 11वर टीम लावत होता परंतु यावर्षी त्याला यातून 1 कोटीचे बक्षीस आणि ऑडी कार जिंकण्यात यश आले.
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीप्रकरणात शिंदे सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का
राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणात शिंदे सरकारला सुप्रीम कोर्टाने धक्का दिला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणी पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती कायम ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या शिंदे सरकारला करता येणार नाहीत.
खारघर प्रकरणात गुन्हा दाखल झाला नाही तर.. ठाकरे गटाचा सरकारला 14 दिवसांचा अल्टीमेटम
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. सुरुवातीला काहीसा अडखळलेला विरोधीपक्ष आता आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहे. काही तासांपूर्वीच माजी महसूलमंत्री आणि काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत यावरुन सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. खारघर दुर्घटनेत जो आकडा सांगितला जातोय त्यापेक्षा जास्त मृत्यू झाल्याची शंका बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. यानंतर आता ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला 14 अल्टीमेटम दिला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारतीय संघ जाहीर
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ७ ते ११ जून दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळेल. बीसीसीआयने 15 जणांचा संघ जाहीर केला आहे. ऋषभ पंतच्या जागी यष्टीरक्षक म्हणून केएस भरतला संधी देण्यात आलीय. कसोटी संघात अजिंक्य रहाणेचं पुनरागमन झालंय. तर सूर्यकुमार यादवला मात्र संधी मिळाली नाही.वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारताकडून सलामीला कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची जोडी दिसेल. गिल गेल्या दोन महिन्यांपासून सर्वच फॉरमॅटमध्ये फॉर्ममध्ये असून त्याने सर्व प्रकारात शतक झळकावलं आहे. तर रोहित शर्मानेही याआधीच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत शतक झळकावलं होतं.
SD Social Media
9850 60 3590