आज दि.२७ एप्रिल च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी अजित पवारांचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र

येत्या महाराष्ट्र दिनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा करावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. अजित पवारांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भातील पत्र लिहिले आहे.“मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीचा लढा दशकाहून अधिक काळ सुरु आहे. अभिजात भाषेसाठीचे सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करत असल्याचे पुरावे तसंच त्यासंदर्भातील तपशीलवार अंतरिम अहवाल महाराष्ट्राच्यावतीने २०१३ मध्ये केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे व २०१४ मध्ये अंतिम निर्णयासाठी केंद्रसरकारकडे पाठवण्यात आला. तेव्हापासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे”, असं अजित पवार पत्रात म्हणाले.

१ मेपासून शिर्डीत बेमुदत बंदची हाक, ‘या’ कारणासाठी ग्रामस्थांसह सर्वपक्षीयांचा निर्णय

साईभक्तांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. १ मे रोजी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन आहे. या दिवशी सुट्टी असल्याने तुम्ही शिर्डीच्या साई मंदिरात जाणार असाल तर थांबा. कारण, १ मे पासून शिर्डीत बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे दर्शनासाठी जाणाऱ्यांना नाहक त्रास होऊ शकतो.शिर्डीच्या साई मंदिरात आता सुरक्षेसाठी सीआयएसएफची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. या सुरक्षेविरोधात सर्वपक्षीयांसह ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे. ही सुरक्षा आल्यास ग्रामस्थांना त्रास होऊ शकतो, याकरता सीआयएसएफ सुरक्षेविरोधात ग्रामस्थांनी बेमुदत बंदची हाक दिली आहे.

सुदानमध्ये सांगलीचे शंभर नागरीक अडकले

सुदानमध्ये सुरु असलेल्या देशांतर्गत यादवी युध्दामुळे सांगली जिल्ह्यातील सुमारे शंभर नागरीक अडकले आहेत. भारतीय दूतावासाने अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी निश्चित केलेल्या ठिकाणापासून बाराशे किलोमीटरवर हे नागरीक अडकले आहेत.सुदान मध्ये गृहयुध्द सुरू असल्याने अनेक भारतीय नागरिक सुदान मध्ये अडकले आहेत. परराष्ट्र खात्याकडून ऑपरेशन कावेरी  अंतर्गत भारतीय नागरिकांना मायदेशी आणले जात असून आतापर्यंत काही भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे. मात्र अनेक लोक सुदान मध्ये अजूनही अडकून आहेत. यात सांगली जिल्ह्यातील ८० ते १०० च्या आसपास नागरिक अजूनही सुदान मध्ये असून यातील काहींना मायदेशात यायचे आहे पण सुदान मधील भारतीय दुतावासाने मायभूमीत आणण्यासाठी निश्चित केलेले ठिकाण हजार ते बाराशे किलोमीटर अंतरावर आहे.

आर्थिक मंदीची चाहूल! आता ‘या’ कंपनीने ८५०० हजार कर्मचाऱ्यांची केली हकालपट्टी!

जागतिक मंदीमुळे जगभरातील अनेक आघाडीच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. यात आता आणखी एका कंपनीची भर पडली आहे. अमेरिकेतील 3M या कंपनीने ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. या संदर्भात कंपनीने सांगितले की, अलीकडच्या काळात कंपनीच्या खर्चात वाढ झाली असून कामकाजात मात्र घट झाली आहे. अशा स्थितीत खर्च कमी करण्यासाठी कंपनीने अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.यापूर्वी कंपनीने २५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. आता नव्याने केलेल्या टाळेबंदीच्या घोषणेनंतर, कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकूण १० टक्के म्हणजेच ८५०० कर्मचाऱ्यांची घट झाली आहे.

एअर इंडिया आपल्या ताफ्यात ५०० नवीन विमाने जोडणार, १००० हून अधिक पदांची भरती करणार

टाटा समूहाच्या मालकीची एअर इंडिया येत्या काळात १००० हून अधिक पदांसाठी नवीन भरती करणार आहे. आपले बाजारमूल्य वाढवण्यासाठी कंपनी पायलट आणि प्रशिक्षक यांसारख्या पदांवर १००० हून अधिक जणांना नोकरीची संधी देणार आहे. एअर इंडियाकडे सध्या १,८०० पेक्षा जास्त पायलट आहेत. एअरलाइन्सने बोईंग आणि एअरबससह ४७० विमानांची ऑर्डर दिली आहे. यामध्ये वाइड बॉडी विमानांचा समावेश आहे.

रिलायन्स कॅपिटलसाठी हिंदुजा समूहाची ९,६५० कोटींची सर्वोच्च बोली

थकीत देणी फेडता न आल्याने दिवाळखोर बनलेल्या रिलायन्स कॅपिटल लिमिटेडला ताब्यात घेण्यासाठी हिंदुजा समूहातील कंपनीने बुधवारी पार पडलेल्या लिलावाच्या दुसऱ्या फेरीत ९,६५० कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावली आहे.हिंदुजा समूहातील इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेडची (आयआयएचएल) बोली गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या लिलावाच्या पहिल्या आणि रद्दबातल झालेल्या फेरीत टोरेंट इन्व्हेस्टमेंट्सने दिलेल्या ८,६४० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय न्यायाधिकरणाने (एनसीएलएटी) गेल्या आठवड्यात रिलायन्स कॅपिटलचा फेरलिलावाला परवानगी दिली होती. लिलावाच्या या दुसऱ्या फेरीत टोरेंट इन्व्हेस्टमेंट आणि ओकट्री यांचा सहभाग नव्हता.

राष्ट्रवादीत मुख्यमंत्रिपदासाठी अनेक आशावादी, जयंत पाटील मनातलं बोलले!

जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज आहे, ते आदर्श मुख्यमंत्री ठरतील, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलं. अमोल कोल्हे यांच्या या विधानावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जोपर्यंत आमचा नंबर येत नाही, तोपर्यंत याची चर्चा करण्यात अर्थ नाही. नंबर आल्यावर एकमताने चर्चा होईल. माझ्या सत्काराच्या कार्यक्रमात कौतुक करताना अमोल कोल्हे यांनी ते वक्तव्य केलं, असं जयंत पाटील म्हणाले.

‘सर’ धोनी अन् रैनाच्या रांगेत, जडेजाचा CSK साठी स्पेशल पराक्रम!

चेन्नई सुपरकिंग्सचा स्टार ऑल राउंडर रवींद्र जडेजा हा आयपीएल 2023 मध्ये चांगल्या फॉर्मात आहे. संघाला आवश्यकता असताना जडेजा बॉलिंग आणि बॅटिंग या दोन्हीमध्ये उत्तम खेळ दाखवत असून दरम्यान जडेजा आज सीएसके विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्या होणाऱ्या सामन्यात एक मोठा पराक्रम करणार आहे.रवींद्र जडेजा 2012 पासून आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ससाठी खेळत आहे, तेव्हा आज राजस्थान विरुद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजा चेन्नई सुपरकिंग्सकडून 150 वा सामना खेळणार आहे. असा सामना खेळणारा जडेजा हा चेन्नईचा तिसरा खेळाडू ठरणार आहे. यापूर्वी एम एस धोनीने 217 तर सुरेश रैनाने 200 सामने चेन्नईसाठी खेळले आहेत. सलग 10 वर्ष रवींद्र जडेजा आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळत आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.