पंतप्रधान मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अदानींचा पुढाकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो येथील हवामान परिषदेत 2070 पर्यंत भारताला शून्य-कार्बन उत्सर्जन देश बनवण्याचा मानस जाहीर केला. त्यासाठी 2030 पर्यंत अक्षय्य ऊर्जेच्या माध्यमातून आपल्या उर्जेच्या 50 टक्के गरज पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. अब्जाधीश गौतम अदानी यांनी देशाला हरित ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने पुढील दहा वर्षांसाठी $70 अब्ज म्हणजेच 5 लाख कोटींहून अधिकचा मेगा प्लॅन तयार केला आहे. या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भारताला शून्य कार्बन उत्सर्जन करणारा देश करण्याचे स्वप्न पूर्ण होईल.

अदानी समूह ही जगातील सर्वात मोठी अक्षय्य ऊर्जा कंपनी असेल. ही कंपनी जगातील सर्वात कमी खर्चात हायड्रोजनचे उत्पादन करणार आहे. यासाठी हा समूह पुढील 10 वर्षांत $70 अब्ज डॉलरची मोठी गुंतवणूक करणार आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL) ही सध्या जगातील सर्वात मोठी सौर ऊर्जा विकसक आहे. 2030 पर्यंत 45 GW अक्षय ऊर्जा निर्माण करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. याशिवाय, 2022-23 पर्यंत, कंपनी दरवर्षी 2 GW सौर ऊर्जा निर्माण करण्याच्या क्षमतेवर 2 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल.

अदानी ट्रान्समिशन लिमिटेड ही सध्या भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी वीज पारेषण कंपनी आहे. सध्या वीज खरेदीमध्ये अक्षय ऊर्जेचा वाटा तीन टक्के आहे. 2023 पर्यंत हे प्रमाण 30 टक्के आणि 2030 पर्यंत 70 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. ब्लूमबर्ग इंडिया इकॉनॉमिक फोरममध्ये बोलताना गौतम अदानी म्हणाले की त्यांचे स्वप्न आहे की अक्षय्य ऊर्जा इतकी स्वस्त असावी की जीवाश्म इंधन म्हणजेच पेट्रोल-डिझेलची जागा घेऊ शकेल.

ग्लासगो येथे झालेल्या हवामान परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, भारत 2070 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन असलेला देश बनेल. याशिवाय 2030 साठी इतर अनेक उद्दिष्टेही निश्चित करण्यात आली आहेत. भारताने 2030 पर्यंत आपली कमी-कार्बन उर्जा क्षमता 500 GW पर्यंत वाढवण्याचे आणि 2030 पर्यंत आपल्या उर्जेच्या 50 टक्के गरजा अक्षय्य ऊर्जेतून पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.