ऑस्ट्रेलियाचा पाकवर 5 गडी राखून विजय, अंतिम सामन्यात एन्ट्री

कमालीच्या फॉर्ममध्ये असलेल्या पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर मात्र शेपूट घातली आहे. सेमीफायनलच्या सामन्यात 5 विकेट्सनी पराभूत होत पाकिस्तान स्पर्धेबाहेर गेला आहे. तर ऑस्ट्रेलियाने थेट अंतिम सामन्यात एन्ट्री मिळवली आहे. आता ऑस्ट्रेलियाचा सामना रविवारी (14 नोव्हेंबर) न्यूझीलंडशी होणार आहे.

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना तसा कमालीचा चुरशीचा झाला. एखाद्या रोलर कोस्टर राइडप्रमाणे कधी पाकच्या तर कधी ऑस्ट्रेलियाच्या दिशेने झुकणाऱ्या सामन्यात अखेर ऑस्ट्रेलियानेच सरशी केली आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने 176 धावांपर्यंत मजल मारली होती. जे टार्गेट ऑस्ट्रेलियाने 5 गडी आणि एक ओव्हर राखून पूर्ण केलं आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील फलंदाज मार्कस स्टॉयनिस आणि मॅथ्यू वेड हे विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.

सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेतला. ज्यानंतर पाकचे सलामीवीर बाबर आणि रिजवान यांनी चांगली सुरुवात केली. 70 हून अधिक धावांची भागिदारी होताच, बाबर 39 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर रिजवान आणि फखरनं डाव सांभाळला. पाकला सामन्यात मोहम्मद रिजवानच्या अर्धशतकाने चांगली सुरुवात करु दिली. पण खरी फिनिशींग फखरच्या अर्धशतकानेच दिली. विशेष म्हणजे फखरचं अर्धशतक हे तुफानी ठरलं कारण पहिल्या 17 चेंडूत त्याने केवळ 17 रन केले. पण अखेरच्या काही षटकात त्याने गिअर वाढवत तुफान खेळी केली. मिचेल स्टार्कच्या 2 ओव्हरमध्ये तीन षटकार ठोकत 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. शेवटच्या 15 चेंडूत फखरने 38 धावा केल्या. रिजवानने 52 चेंडूत 67 धावांची तर फखर जमानने 32 चेंडूत 55 धावांची खेळी केली. ज्याच्या जोरावर पाकने 176 धावांपर्यंत मजल मारली.

177 धावांचे खमके आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात अतिशय खराब झाली. कर्णधार शून्यावर बाद झाला. ज्यानंतर वॉर्नर आणि मार्शने सामना सांभाळण्याचा प्रय्तन केला पण मार्श 28 धावा करुन तंबूत परतला. ज्यानंतर स्मिथ, मॅक्सेव 5,7 धावा करुन बाद झाले. त्याच काही ओव्हर्समध्ये सामना सांभाळणारा वॉर्नरी 49 धावा करुन बाद झाला. निम्मा संघ तंबूत परतल्यानंतर मात्र क्रिजवर आलेल्या मार्कस स्टॉयनिस आणि मॅथ्यू वेड यांनी तुफान फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला 5 गडी आणि एक ओव्हर राखून विजय मिळवून दिला. शाहीन आफ्रिदीच्या 19 व्या षटकात वेडने लागोपाठ 3 सिक्स मारुन सामना जिंकवला. यावेळी मार्कसने नाबाद 40 आणि मॅथ्यूने नाबाद 41 धावांची खेळी केली.

19 व्या षटकात मॅथ्यूच्या तुफान सिक्सेसमुळे सामना पाकला गमवावा लागला. पण याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पाकिस्तानच्या हसन अलीने मॅथ्यूचा एक झेल देखील सोडला. जो सामन्यात टर्निंग पॉईंट ठरला. कारण ती कॅच घेतली असती तर पुढील षटकार मॅथ्यू मारु शकला नसता आणि पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला नसता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.