शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी. अखेर पिंपळगाव बसवंत येथे सुरू असलेला संप माथाडी कामगारांनी गुरुवारी मागे घेतल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत उद्या शुक्रवारपासून कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू होणार आहेत.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांकडे कांद्याच्या गोदामावर काम करणाऱ्या टोळी दोनच्या माथाडी कामगारांनी मंगळवारी अचानक संप पुकारला होता. त्यामुळे व्यापाऱ्यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत कांदा लिलाव बंद राहणार असल्याची घोषणा केली. ऐन दिवाळीनंतर हे आंदोलन सुरू झाले. खरे तर दिवाळी आणि साप्ताहिक सुट्ट्या मिळून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या अगोदरच दहा दिवस बंद होत्या. त्यानंतर हे आंदोलन सुरू झाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली. मात्र, या आंदोलनावर तोडगा निघत नव्हता. शेवटी नाशिक येथे कामगार आयुक्तांनी तातडीने दखल घेत कांदा व्यापारी आणि टोळी क्रमांक दोनच्या माथाडी कामगारांची बैठक घडवून आणली. या बैठकीत कामगांरांच्या विविध मागण्यांवर तोडगा काढण्यात आला. त्यामुळे संपावर गेलेल्या जवळपास साडेतीनशे माथाडी कामगारांनी कामावर येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीनेही उद्या शुक्रवारपासून कांद्याचे लिलाव सुरळीत सुरू होतील, अशी माहिती दिली. या आंदोलनाचा तिढा सुटल्याने कांद्याच्या लिलावाच्या प्रतीक्षेत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.