ऐन दिवाळीनंतर सराफा बाजारपेठेमध्ये सोन्याच्या दरांनी गगन भरारी घेतली असून, 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 50 हजार 900 रुपये नोंदवले गेले आहेत, अशी माहिती दी नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी बोलताना दिली.
नवसे म्हणाले की, नाशिकच्या सराफा बाजारात सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 49 हजार 250 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46 हजार 280 रुपये नोंदवले गेले. बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48 हजार 750 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 47 हजार 250 रुपये नोंदवले गेले, तर चांदीचे दर किलोमागे 67000 रुपये नोंदवले गेले. मात्र, गुरुवारी सोन्याच्या दरांनी उसळी घेतली. त्यात 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 50 हजार 900 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 49500 रुपयांवर गेले. चांदीच्या दारीतही वाढ झालेली पाहायला मिळाली. चांदीचे दर किलोमागे 2 हजारांनी वाढून 69000 हजारांवर पोहचले आहेत. दरम्यान, पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, ‘बीआयएस’च्या संकेतस्थळावर नमूद केल्याप्रमाणे ज्वेलर्स किंवा किरकोळ विक्रेत्याकडून प्राप्त झालेल्या बिल / इनव्हॉइसमध्ये हॉलमार्क केलेल्या वस्तूंचा तपशील असणे आवश्यक आहे. हॉलमार्क केलेल्या मौल्यवान धातूच्या वस्तूंच्या विक्रीचे बिल किंवा इनव्हॉइसमध्ये प्रत्येक वस्तूचा तपशील, मौल्यवान धातूचे निव्वळ वजन, कॅरेट, शुद्धता आणि हॉलमार्किंग शुल्क नमूद केले पाहिजे.