राणा दाम्पत्यावर थेट राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान देणा-या राणा दाम्पत्यावर झालेली कारवाई हा विरोधकांसाठी इशारा मानला जातो आहे.
याआधी नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्यांना अटक झाली. नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना म्याँव म्याँव केलं. त्यांनाही अटक झाली.
राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं. त्यांना अटक करून थेट राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही हिटलरी प्रवृत्ती असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
आता मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज ठाकरेंनी ३ मेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. मात्र राणा दाम्पत्यावर झालेली कारवाई हा विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी दिलेला इशाराच असल्याचं मानलं जातंय. जे कुणी उद्धव ठाकरेंवर टीका करतील, त्यांच्यावर अटकेची कारवाई होईल, असा स्पष्ट इशारा यातून दिला जातोय.
मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या या अटक पॅटर्नचीच चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. त्यात मोहित कंबोज आणि किरीट सोमय्यांवर पोलिसांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी प्राणघातक हल्ले केले. त्यामुळं महाराष्ट्राचा केरळ आणि पश्चिम बंगाल होतोय की काय, अशी भीती विरोधकांना वाटतेय.