इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर महिला प्रीमियर लीगचे आयोजन बीसीसीआयकडून केले जाणार आहे. यंदा WPL चा पहिला हंगाम होणार आहे. आयपीएलचे चेअरमन अरुण धूमल यांनी याबाबत मोठी घोषणा केली असून स्पर्धा कधीपासून कधीपर्यंत आयोजित केली जाणार आहे याची माहिती दिलीय.
अरुण धूमल यांनी सांगितले की, पाच संघांचा सहभाग असलेली महिला प्रीमियर लीग ४ मार्चपासून सुरू होईल. या स्पर्धेतला अंतिम सामना २६ मार्च रोजी होणार आहे. महिला आयपीएलमधील सर्व सामने मुंबईतच होणार आहेत. ब्रेबॉन स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर हे सामने होणार आहेत.
आयपीएलच्या आधी बीसीसीआय महिला प्रीमियर लीग खेळवणार आहे. आयपीएल २०२३ च्या हंगामाची सुरुवात रविवारी २६ मार्च रोजी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महिला प्रीमियर लीगसाठी अद्याप मेगा ऑक्शन झालेलंं नाही. लग्नाच्या सिझनमुळे बीसीसीआयला मेगा ऑक्शनसाठी हॉटेल मिळत नसल्याने तारीख निश्चित झालेली नाही. दरम्यान, १३ फेब्रुवारी रोजी लिलाव होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
WPLसाठी लिलावात पाच संघांमध्ये चढाओढ असेल. यात मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, लखनऊ, बेंगलुरुचे संघ आहेत. सध्या बीसीसीआय या स्पर्धेचे सामने एकाच शहरात खेळवणार असून भविष्यात होम अँड अवे अशा पद्धतीने सामने होण्याची शक्यता आहे.