‘शिवरायांसारख्या महापुरुषाला आणि ‘महाराष्ट्र’या कल्पनेला जन्म देणारे पराक्रमी शहाजीराजे कर्नाटकाच्या मातीत (कशाबशा 20 गुंठे जमिनीवरच्या उघड्या माळरानावर ) एकाकी स्थितीत चिरनिद्रा घेत आहेत. त्या वीर पित्याच्या समाधीवर साधे गंजक्या पत्र्याचे सुद्धा छप्पर नाही. ती दुरवस्था पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी आणि पोटात गोळा उठेल,’ अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक आणि पानिपतकार विश्वास पाटील यांनी फेसबुक पोस्ट लिहून व्यक्त केली आहे. विश्वास पाटील आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात की, आज सर्व राजकीय पक्ष सागरात शिवरायांचे स्मारक बांधण्याची व त्यासाठी हजारो कोटी खर्च करायची भाषा बोलत आहेत.
ते स्मारक होईल तेव्हा होईल. पण त्याआधी शिवरायांना जन्म देणाऱ्या त्यांच्या पित्याच्या सावलीसाठी कर्नाटकात एक टेम्पो भरून पत्रे तरी पाठवून द्यायची व्यवस्था करू या. महाराष्ट्राच्या महापित्याच्या स्मारकापासून दूर होताना माझे मन भरून आले होते. माझ्या अंगात लेखकीय रक्त आणि मेंदूत कल्पनेचे पंख असल्यामुळे मी त्या स्मारकाच्या द्वाराजवळ थबकलो. थोडे आभाळाकडे पाहिले. मनात कल्पना केली. जर हे स्मारक बघायला शिवराय आणि जिजाऊ साहेब आज स्वतः तिथे दाखल झाले, तर त्यांच्या मनाची काय अवस्था होईल? जिजाऊ मातोश्री हळहळत बोलतील, ‘आम्ही या मराठी मुलखासाठी कोणता वसा, वारसा आणि भविष्यकाळ दिला? अन बाळांनो दिल्लीकर जहांगीर आणि शहजान सारख्या बादशाहाना पुरून उरणार्या आमच्या महाप्रतापी कुंकवाच्या धन्याच्या स्मृतींचे आपण हे काय हाल चालवले आहेत ?
गनिमी काव्याच्या युद्धतंत्राची दीक्षा महागुरू शहाजी महाराजांनीच आपले पुत्र शिवरायांना दिली होती. एवढेच नाही तर शिवरायांची प्रसिद्ध राजमुद्राही संस्कृत भाषेचे प्रकांड पंडित असलेल्या शहाजीराजांनी स्वतः लिहिली होती. जेव्हा 1624 साली दिल्लीचा बादशहा औरंगजेबाचा आजा जहांगीर आणि विजापूरचा इब्राहिम आदिलशहा यांची फौज इथे चालून आली होती. तेव्हा भातवडीच्या लढाईत शहाजीराजे आणि मलिक अंबर या दोघांनीच ‘गनिमी कावा’ नावाच्या युद्धमंत्राला पहिल्यांदा जन्म दिला होता. त्याच्या जोरावर तेव्हा केवळ चाळीस हजारांच्या फौजेनिशी या दोघांनी विजापूरकर आणि दिल्लीकरांच्या एक लाखांच्या फौजेचा धुव्वा उडवल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विश्वास पाटील पुढे म्हणतात की, नुकताच मी कर्नाटकात जाऊन आलो. शिमोगा या शहरापासून एक तासाच्या अंतरावर असणाऱ्या होजिगिरी नावाच्या खेड्यात (जिल्हा दावणगिरी ) शहाजी राजांच्या समाधी स्थळाला भेट दिली. 23 जानेवारी 1664 ला याच परिसरात राजांचा घोड्यावरुन पडून अपघात झाला. इथेच महानिर्वाण झाले. आज फक्त एकवीस गुंठे जागेत गावाबाहेरच्या माळावर राजांची अत्यंत छोटी एकाकी समाधी दिसते. एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या शेतातली आई-वडिलांची समाधी सुद्धा यापेक्षा खूप चांगली असते हो!