ऑलिंपिक्स २०२० मध्ये भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने देशाची मान उंचावली आहे. शुक्रवारी (६ ऑगस्ट) पुरुषांच्या फ्रीस्टाईल ६५ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात बजरंगने इराणच्या मोर्तेझा चेका घियासीला चितपट करत २-१ ने वियय मिळवला. तसेच उपांत्य फेरी गाठली आहे.
पहिल्या राऊंडमध्ये बजरंगला तांत्रिक आधारे मोर्तेझाकडून एक पेनल्टी गमावून ०-१ ने पिछाडीवर राहावे लागले. त्यामुळे त्याच्यासमोर सामन्यात पुनरामगन करण्याचे आव्हान होते. मात्र, मोर्तेझाने त्याला संधीच दिली नाही आणि पहिला राऊंड राऊंड आपल्या नावावर केला.
इराणचा मोर्तेझा सातत्याने आक्रमक खेळ करत होता. तरीही बजरंगही त्याला दाव लावण्याची संधी देत नव्हता. मात्र, जेव्हा दुसऱ्यांदा पेनल्टी गुण गमावण्यापासून वाचण्यासाठी ३० सेकंदाचा वेळ दिला, तेव्हा बजरंगला आक्रमक व्हावे लागले.
झाले असे की, बजरंगचा पाय पकडून त्याला अडकवण्याच्या प्रयत्नात इराणचा मोर्तेझा स्वत:च बजरंगच्या तावडीत सापडला. बजरंगने या संधीचा पूर्ण फायदा घेतला आणि पहिले दोन गुण मिळवले. यानंतर त्याने मोर्तेझाला पलटत त्याचे खांदे जमीनीला लावून चितपट करत सामना संपवला.
बजरंग पुनियाने किर्गिस्तानच्या एर्नाझार अकमातलीवला तांत्रिक गुणांच्या आधारे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले होते.