100 वर्षे जुनी परंपरा
आपल्या देशात अनेक जाती-धर्मांचे नागरिक एकत्र राहतात. दिवाळी, ईद असो अथवा ख्रिसमस, प्रत्येक सण तितक्याच उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. मुस्लिम धर्मात मोहरम हा महत्त्वाचा सण मानला जातो. दर वर्षी हा सण आला, की बिहारमधलं एक गाव जोरदार चर्चेत येतं.
अर्थात त्यामागे कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. या गावातले हिंदू धर्माचे नागरिकदेखील मोहरम हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. गेल्या काही दशकांपासून या गावातले नागरिक हा सण साजरा करत असून, यातून हिंदू-मुस्लिम सलोखादेखील जपला जात आहे. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
मुस्लिम धर्मात मोहरम हा सण महत्त्वाचा आहे. प्रेषित मोहम्मद यांच्या मुलीचे धाकटे पुत्र म्हणजे त्यांचे नातू हजरत इमाम हुसेन यांच्या हौतात्म्याचं स्मरण म्हणून मुस्लिम समुदायाकडून हा सण साजरा केला जातो. यंदा 31 जुलैपासून मोहरम सुरू झाला आहे. या दिवसापासून 10व्या दिवसाला यौम-ए-आशुरा म्हणतात. या दिवशी मुस्लिम समाज हजरत इमाम हुसेन यांच्या हौतात्म्याबद्दल शोक व्यक्त करतो. बिहारमधल्या कटिहार जिल्ह्यातल्या हसनगंज भागातल्या महमदिया हरिपूर या गावातले हिंदू धर्माचे नागरिकदेखील दर वर्षी मोहरम हा सण साजरा करतात. महमदिया हरिपूर या गावाच्या नावातूनदेखील हिंदू-मुस्लिम सलोख्याची झलक पाहायला मिळते. कित्येक दशकांपासून या गावातले नागरिक हा सण साजरा करत आहेत. यामागची कहाणी मोठी रंजक आहे.
`पूर्वजांनी दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी या गावात ही परंपरा पाळली जात आहे,` असं येथील ग्रामस्थ सांगतात. `येणाऱ्या पिढ्यादेखील ही परंपरा कायम ठेवतील,` अशी आशादेखील ते व्यक्त करतात. `येथील हिंदू धर्माचे नागरिक दर वर्षी मोहरम साजरा करतात. या गोष्टीची सर्वत्र चर्चा होते. मागील दोन वर्षं कोरोनामुळे मोहरम साधेपणानं साजरा करण्यात आला. यंदा मात्र पारंपरिक पद्धतीनं मोहरम साजरा करण्यात येणार आहे,` असं तिथल्या ग्रामस्थांनी सांगितलं.
या गावात हिंदू धर्माच्या नागरिकांकडून मोहरम सण साजरा करण्यामागे एक कहाणी सांगितली जाते. महमदिया हरिपूर गावात पूर्वी वकील मियॉं नावाचे गृहस्थ राहत होते. मुलाच्या निधनानंतर ते गाव सोडून निघून गेले. गाव सोडण्यापूर्वी त्यांनी त्यांचे मित्र छेदी शाह यांना गावात मोहरम साजरा करण्यास सांगितलं होतं. या गावात हिंदूंची संख्या जास्त आहे. 1200 लोकसंख्या असलेल्या या गावात वकील मियॉं गेल्यानंतर एकही मुस्लिम कुटुंब शिल्लक राहिलं नाही; मात्र त्यांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी या गावातले हिंदू धर्माचे नागरिक मोहरम साजरा करतात, असं ग्रामस्थांनी सांगितलं.
दर वर्षी या गावातले हिंदू धर्माचे नागरिक मोहरम सण साजरा करतात. यात महिला मोठ्या संख्येनं सहभागी होतात. हिंदू समाजातले नागरिक दर्ग्यावर चादर चढवतात. इमाम हुसेन यांच्या हौतात्म्याचे स्मरण करून घोषणा देतात. तसंच फतिहा पठण केलं जातं. एवढंच नाही, तर संपूर्ण गावात ताजियाची मिरवणूकही काढली जाते.