घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागातील रुग्णाचे डोळे उंदरांनी कुरतडल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. श्रीनिवास यल्लप्पा असं या रुग्णाचं नाव असून त्याचा आज मृत्यू झाला. पण मृत्युचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
श्रीनिवास यल्लपा या २४ वर्षीय रुग्णाला श्वसनाचा त्रास होत असल्याने दोन दिवसांपूर्वी राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मेंदूज्वर आणि किडनीचा त्रास असल्याने या रुग्णाला पालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. काल सकाळी नातेवाईकांना रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचं दिसल्यानंतर त्यांनी तात्काळ हा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आणून दिला. डोळ्यांची तपासणी केली असता उंदराने डोळा कुरतडल्याचं समोर आलं.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तात्काळ याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले. अतिदक्षता विभागातील तळमजल्यावर असला तरी हा विभाग सर्व बाजूने बंद आहे. पावसाळा असल्याने दरवाजामधून तो उंदीर आत गेला असावा. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती महापौरांनी दिली.