महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्याने महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. त्यानंतर बरेच प्रयत्न केल्यानंतर शिंदे गट फुटला आणि राज्यात भाजपला सत्ता मिळू शकली. इथला आनंद साजरा करीत असतानाच भाजपला मोठा धक्का बसण्याची चिन्हं आहेत. बिहारमध्ये पुन्हा एकदा जेडीयू-भाजप युती तुटण्याच्या मार्गावर आहे. 11 ऑगस्टपर्यंत जेडीयू भाजपची साथ सोडू शकतं, असं समोर येत आहे. नितीश कुमार यांनी सोनिया गांधी यांच्याशी फोनवर चर्चा केली असून भेटीची वेळ मागितल्याची बातमी समोर आली आहे.
संपूर्ण देश भाजपमय करण्याचा प्रयत्न करणारे अमित शहा यांनी मात्र आपली सूत्र हलवण्यास सुरुवात केली आहे. सीएनएन News18 च्या वरिष्ठ राजकीय पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार, अमित शहा यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना फोन केला होता. सरकार वाचवण्यासाठी अमित शहांकडून हा शेवटचा प्रयत्न असल्याचं मानलं जात आहे. JDU कडून आलेल्या माहितीनुसार, सकाळी अमित शहा यांनी फोन केला होता. मात्र अमित शहांच्या कार्यालयातून हे वृत्त नाकारण्यात आलं आहे.