केंद्र सरकारने अमली पदार्थांबाबत शून्य-सहिष्णुता धोरण अवलंबले असून त्याचे परिणाम दिसून येत आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले आहेत. गृहमंत्री शाह यांच्या हस्ते शनिवारी पंजाब राजभवनात अमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या दोन दिवसीय नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
काय म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह –
यावेळी केंद्रीय गृहमंत्री शाह म्हणाले की, निरोगी समाज आणि समृद्ध राष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शून्य-सहिष्णुता धोरण आवश्यक आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे देखील महत्त्वाचे आहे. कारण अमली पदार्थांच्या व्यापारातून निर्माण होणारा गलिच्छ पैसा देशाविरुद्धच्या कारवायांमध्ये वापरला जातो. जेव्हा नरेंद्र मोदीजी 2014 मध्ये पंतप्रधान झाले, तेव्हा भारत सरकारने अमली पदार्थांबाबत शून्य-सहिष्णुता धोरण स्वीकारले. अमली पदार्थांच्या विरुद्धच्या लढ्यात वेगाने आणि योग्य दिशेने प्रगती होत असून त्याचे परिणाम दिसू लागले आहेत, असेही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, अमली पदार्थांचा युवा पिढीवर विपरित परिणाम होतो. अमली पदार्थांमुळे सेवन करणाऱ्यांवरच नाही तर समाज, अर्थव्यवस्था आणि देशाच्या सुरक्षेवरही विपरित परिणाम होतो. त्यामुळे याचा नायनाट करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या डोळ्यासमोर एनसीबीने जप्त केलेले 30,000 किलोहून अधिक ड्रग्ज नष्ट केले आहे. एनसीबीने 1 जूनपासून अमली पदार्थ निर्मूलन मोहीम सुरू केली होती आणि 29 जुलैपर्यंत 11 राज्यांमध्ये 51,217 किलोपेक्षा जास्त अमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
NCB ने घेतलीये शपथ –
30,468 किलोपेक्षा जास्त औषधांची विल्हेवाट लावल्यानंतर, एकूण प्रमाण NCB च्या लक्ष्याला ओलांडून सुमारे 81,686 किलोपर्यंत पोहोचेल, जे ड्रग्जमुक्त भारताच्या लढ्यात एक मोठी उपलब्धी आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले. शनिवारी दिल्लीत 19,320 किलो, चेन्नईमध्ये 1,309 किलो, गुवाहाटीमध्ये 6,761 किलो आणि कोलकात्यात 3,077 किलो ड्रग्ज नष्ट करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्याचे आवाहन केल्यावर, NCB ने स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्त 75,000 किलो ड्रग्ज नष्ट करण्याची शपथ घेतली आहे.