वेशांतर करून पोलीस आयुक्तांनी घेतला कामगिरीचा आढावा

पोलीस स्टेशनमध्ये खरोखरच पोलीस नेमकं कसं काम करतात, याचा अनुभव सामान्यांसाठी काही नवा नाही. पण हे पाहण्यासाठी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नामी शक्कल लढवली. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आज वेषांतर करत लॉकडाऊनमध्ये पोलिसांच्या कामगिरीचा आढावा घेतला. यासाठी त्यांनी रोजा पकडलेल्या वृद्ध मुस्लिम व्यक्तीचा वेष परिधान करत वाकड, हिंजवडी आणि पिंपरीमध्ये पाहणी केली. यामध्ये त्यांना वाकड आणि हिंजवडी पोलिसांचे काम समाधानकारक वाटले, तर पिंपरी पोलीस स्टेशन काहीसे गंभीर नसल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश जमालखान पठाण बनले होते. दाढी लावून, डोक्यावर लालसर रंगाचा केसांचा विग घातला आणि सलवार, कुर्ता आणि तोंडावर मास्कही होता. तर मियाची बिवी म्हणून सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे या देखील वेशांतर करून त्यांच्यासोबत होत्या. हे मुस्लिम दाम्पत्य खासगी टॅक्सी करून रात्री सव्वा बाराच्या सुमारास पिंपरी पोलीस ठाण्यात आले. पोलीस कर्मचारी नेहमीप्रमाणे ठाण्यात बसले होते, मध्यरात्री एक मुस्लिम दाम्पत्य तक्रार देण्यासाठी ठाण्यात आले.

संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची चांगलीच भंबेरी

पोलिसाने तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत उडवाउडवीची उत्तरे दिले, मात्र काही वेळातच संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची चांगलीच भंबेरी उडाली. कारणही दस्तुरखुद्द पोलीस आयुक्तच तक्रारदार म्हणून पोलीस ठाण्यात आल्याचं त्यांना समजलं. त्या पोलीस दाम्पत्याला तिथेही सामान्यांसारखाच अनुभव आला. त्यानंतर हे दाम्पत्य रात्री दीडच्या सुमारास हिंजवडी पोलीस स्टेशन आणि नंतर दोन वाजता वाकड ठाण्यात गेलं. पिंपरी पोलीस ठाण्याचा त्यांना फार वाईट अनुभव आला. मात्र, वाकड आणि हिंजवडीत चांगल्या अनुभवानं ते संतुष्ट झाले. तसेच यापुढेही अशाच प्रकारे पोलीस स्टेशनला भेट देण्याचा सिलसिला सुरू ठेवणार असल्याचंही पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.