आज दुपारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर संजय राऊत बाहेर आले व माध्यमांशी काहीही न बोलता निघून गेले. अशातच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठकीमध्ये खासदार आणि संजय राऊत यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे.
हे वृत्त समोर असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेच्या खासदारांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे. गृहमंत्री अमित शहा हे कृष्णा मेनन या निवासस्थानात राहतात. या निवासस्थानाला एकूण तीन प्रवेशद्वार आहेत. यापैकी मुख्य प्रवेशद्वार हे मेनन रोडवर आहे, तर या निवासस्थानाला एक मागील प्रवेशद्वार देखील आहे.
तसेच एक मधले प्रवेशद्वार देखील आहे. याच मागच्या प्रवेशद्वारातून शिवसेनेचे एकूण 11 खासदार गृहमंत्री अमित शहा यांना भेटले, अशी माहिती सांगितली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या खासदारांबरोबर गृहमंत्र्यांनी सविस्तर चर्चा केल्याची सूत्रांची माहिती आहे. कोणत्या खासदारांनी कोणत्या मुद्द्यावर कधी आणि कसं पत्र द्यायचं आणि पक्षप्रमुख ठाकरे यांना कोंडीत पकडायचं यासंदर्भातली चर्चा या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती आहे.
18 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मुर्मू यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी सेनेच्या एका तरुण आणि उच्चशिक्षित खासदाराने व्यूहरचना केल्याची खात्रीलायक माहिती आहे. अमित शहा यांच्याकडे 11 खासदारांना घेऊन जाणारा खासदार शिंदेचा खास समजला जातो.