आदित्य ठाकरेंविरोधात FIR दाखल करा, राष्ट्रीय बाल आयोगाच्या आदेशाने मुंबईत खळबळ

महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पाय उतार झाल्यानंतरही केंद्र सरकार आणि ठाकरे यांच्यात वाद अजूनही सुरूच आहे. शिवसेनेचे आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अशी नोटीसच राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाच्या वतीने मुंबई पोलीस आयुक्तांना नोटीस बजावण्यात आली आहे.

राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाच्या वतीने आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी  मुंबई पोलीस आयुक्तांना नोटीस बजावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी आरे बचाव आंदोलनात लहान मुलांचा उपयोग केल्याचा आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.

त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची सूचना राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाने दिली आहे.  3 दिवसांत एफआयआरआरसह अहवाल देण्याचा राष्ट्रीय बाल आयोगाने मुंबई पोलिसांना आदेश दिले आहे. राष्ट्रीय बाल आयोगाच्या या पत्रामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

राज्यात आलेल्या नवीन सरकारने मुंबईचं फुफ्फुस म्हणून ओळख असलेल्या आरे जंगलातच मेट्रो कारशेड बांधण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाविरोधात पर्यावरणवाद्यांकडून आरेत आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात आदित्य ठाकरे सहभागी झाले होते.  यावेळी पर्यावरणवाद्यांची भेट घेऊन या आंदोलनाला आमचा भक्कम पाठिंबा असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितलंय. ‘आरे बचावासाठी शिवसेना सदैव लढा देईल आणि मुंबईच्या फुफ्फुसांना धक्का पोहचू देणार नाही,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.

मुंबईतील मेट्रोच्या वेगवेगळ्या मार्गाचं मेट्रो कारशेड फडणवीस सरकारच्या काळात आरेत उभारण्याचा निर्णय झाला होता. या निर्णयाविरोधात पर्यावरणवादी आणि मुंबईकरांकडून विरोध होत होता. त्यावेळी शिवसेनेने देखील आरेमधील कारशेडला विरोध करत हा प्रकल्प इतरत्र उभारण्याचा शब्द मुंबईकरांना दिला. त्यानुसार ठाकरे सरकार येताच हा प्रकल्प आरे मधून हलवून कांजूरमार्ग येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता नव्याने आलेल्या शिंदे सरकारने पुन्हा एकदा कांजूरमार्गमधील प्रकल्पाला स्थगिती देत आरेतच कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात पुन्हा एकदा पर्यावरणवादी आणि मुंबईकरांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

“अडीच वर्षांपूर्वी जेव्हा आपलं सरकार आलं तेव्हा आपण आरे जंगल म्हणून घोषित केलं होतं आणि कांजूरला कारशेड करणार असा निर्णय घेतला होता. पण हे सरकार आमच्या पाठीत खंजीर खुपसून तयार झाले आणि आता आरेत पुन्हा कारशेड उभारून मुंबईकरांच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत,” अशी टीका यावेळी आदित्य ठाकरे यांनी सरकारवर केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.