चारा घोटाळ्याप्रकरणी लालू यादव
यांना पाच वर्षांची शिक्षा
डोरंडा कोषागारातून १३९.३५ कोटी बेकायदेशीरपणे काढल्याच्या चारा घोटाळ्याप्रकरणी आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रांची सीबीआय कोर्टचे विशेष न्यायाधीश एसके शशी यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही शिक्षा सुनावली. लालू प्रसाद यांना ६० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणात दोषी आढळलेल्या आणखी ३७ जणांना शिक्षा सुनावण्यात येत आहे. १५ फेब्रुवारी रोजी लालू प्रसाद यांच्यासह ३८ आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते. यानंतर लालू प्रसाद यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली.
डिसेंबर महिन्यात ओमायक्रॉनची
लाट येईल, बिल गेट्स यांनी दिला इशारा
मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी जगावर लवकरच आणखी एका महामारीचं संकट येईल असा इशारा दिला आहे. गेट्स यांनी सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत वेगळ्या संसर्गामुळे ही महामारी येईल असं सांगताना करोनाशी काही संबंध नसेल असंही म्हटलं आहे. दरम्यान लसींची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने करोनापासून होणाऱ्या गंभीर संसर्गाचा धोका कमी झाला असल्याचंही ते म्हणाले आहेत. बिल गेट्स यांनी डिसेंबर महिन्यात ओमायक्रॉनची लाट येईल अशा इशारा दिला आहे.
तरुण पिढीला सशक्त करणे म्हणजे
भारताचे भविष्य मजबूत करणे : पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ च्या अंमलबजावणीबाबत शिक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या वेबिनारला संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी करत याची माहिती दिली होती. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा शैक्षणिक क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होईल, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. तरुण पिढीचे भारताचे भविष्य असे वर्णन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भारताच्या भावी नेत्यांना सक्षम करण्याचे आवाहन केले. आपली आजची तरुण पिढी ही देशाच्या भविष्याचे कर्णधार आहेत, ते भविष्याचे निर्माते आहेत. त्यामुळे आजच्या तरुण पिढीला सक्षम बनवणे म्हणजे भारताचे भविष्य मजबूत करणे होय, असे पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ च्या शैक्षणिक क्षेत्रावरील सकारात्मक प्रभावावर भर देताना सांगितले.
नारायण राणे यांच्या बंगल्यावर
कारवाई करण्याचे आदेश
राणे कुटुंबीयांचा मालवण जिल्ह्यातील चिवला समुद्रकिनाऱ्यावर निलरत्न बंगला आहे. केंद्र सरकारने या बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. हा बंगला बांधताना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार करण्यात आली असल्याने हे आदेश देण्यात आले आहेत. एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने ऑगस्ट २०२१ मध्ये ही तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र कोस्टल प्राधिकरणाला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
शेततळयात बुडून
तीन मुलांचा मृत्यू
औरंगाबाद शहराजवळील शेकापूर शिवारातील एका शेततळयात बुडून तीन मुलांचा मृत्यू झाला. हे तिघेही गावाशेजारी सायकलवरून फिरायला गेले होते. हे तिघे शेततळ्यात कसे पडले याबद्दल अद्याप फारशी माहिती उपलब्ध नाही. सोमवारी सकाळी शेततळ्यात पडून मृत पावलेल्या तीन मुलांची नावं प्रतिक आनंद भिसे (वय१५), तिरूपती मारूती दळकर (१५) व शिवराज संजय पवार (वय १७, सर्व रा. सारा संगम, बजाजनगर), अशी माहिती पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार
यांना साक्ष नोंदवण्यासाठी समन्स
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना साक्ष नोंदवण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसाचार घडला होता. या प्रकरणात शरद पवार यांना सरकारच्या चौकशी आयोगासमोर आपली साक्ष नोंदवण्यास सांगितले आहे. यासंदर्भात शरद पवार यांना २३ फेब्रुवारी रोजी साक्ष नोंदवण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. शरद पवार यांनीही एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. यामध्ये पवारांनी कोरेगाव भीमाबद्दल काही माहिती दिली होती. त्यानंतर पवारांचा जबाब नोंदवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती.
लबाडी लोकांसमोर आणल्याने
राऊत शिवीगाळ करतात : सोमय्या
किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. संजय राऊतांना त्यांनी दिलेल्या *** या शिवीचा अर्थ कळतो का?, असा सवाल करत अर्थ कळत नसेल तर माझ्या बायको आणि आईला जाऊन विचारा, असं म्हणाले. संतापलेले किरीट सोमय्या पुढे म्हणाले की, “माझी बायको आणि सूनबाई दोघीही मराठी आहेत. अशा प्रकारची शिवी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंतर्फे संजय राऊत देतात. कारण मी त्यांची चोरी लबाडी लोकांसमोर आणली. त्यांचे घोटाळे लोकांसमोर आणले म्हणून मला शिवीगाळ करत आहेत,” असा आरोप सोमय्यांनी केला.
पंजाब विधानसभेच्या 117
जागांसाठी 63.44 टक्के मतदान
पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रविवारी सकाळी 117 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आणि संध्याकाळी 6 वाजता मतदान पूर्ण झालं. हाती आलेल्या आकडेवारीनुसार संध्याकाळी 5 पर्यंत 63.44 टक्के मतदान झालं.
संत ज्ञानेश्वर उद्यानाला
आले भकास स्वरुप
औरंगाबादचे हरित वैभव असलेल्या पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाला वर्तमान स्थितीत अत्यंत भकास स्वरुप आले आहे. केवळ साफसफाई अभावी मागील दोन वर्षांपासून हे उद्यान बंद आहे. उद्यानाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यानं उद्यान म्हणजे जनावरे चरण्याचं ठिकाण झालं आहे. त्यामुळे आता शहरातील नागरिक एकवटले असून उद्यानाच्या विकासासाठी केवळ घोषणा करणाऱ्या राजकारण्यांना घेरण्याचं काम त्यांनी हाती घेतलं आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दोन वर्षांपूर्वी या उद्याानला पाच कोटींचा निधी देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर त्यांनी कधीही उद्यानाच्या कारभारात लक्ष घातले नाही, अशी खंत पैठणकरांची आहे.
SD social media
9850 60 35 90