दिशा सालियान, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात कनेक्शन

अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि त्याची एक्स-मॅनेजर दिशा सालियान यांच्या मृत्यू प्रकरणावरुन उडालेला धुरळा काही केल्या शांत होताना दिसत नाही. राणे कुटुंबीयांनी दिशा सालियानच्या कथित आत्महत्या प्रकरणावरुन शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे. दोघांच्या मृत्यूला दीड वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिका आजही सुरुच आहे. त्यातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी सकाळ-सकाळी एकामागून एक चार ट्वीट्स करत दिशा सालियान आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात कनेक्शन असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आहे. दिशाला ज्या काळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमधून मालाडला नेण्यात आली, ती वाझेची आहे का, असं नितेश राणेंनी सुचवलं आहे.

“मालवणी पोलिसांची भूमिका पहिल्या दिवसापासून संशयास्पद राहिली आहे. आता त्यांना दिशा सालियान केसमध्ये अहवाल सादर करण्यास सांगितला आहे. आठ तारखेच्या रात्री उपस्थित असलेला आणि दिशासोबत राहणारा रोहन राय सर्वांसमोर येऊन मोकळेपणाने का बोलत नाही?” अशा आशयाचं ट्वीट भाजप आमदार नितेश राणे यांनी आज (मंगळवार) सकाळी 6 वाजून 27 मिनिटांनी केलं.

मुंबईच्या महापौरांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहिलं आणि त्यानंतर मालवणी पोलिसांना दिशा सालियान केसमध्ये अहवाल सादर करण्यास सांगितलं. त्यामुळे आठ जूनच्या रात्री काहीच घडलं नाही, असं दाखवून प्रकरण लपवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होत आहे. मला आनंद वाटला, किमान ते स्वतःचीच कबर तरी खणत आहेत” असा टोला नितेश राणेंनी हाणला आहे.

“दिशाला आठ तारखेच्या रात्री (8 जून 2020 – दिशा सालियानच्या मृत्यूचा दिवस) ब्लॅक रंगाच्या मर्सिडीजने पार्टीतून तिच्या मालाडमधील घरी नेण्यात आले होते. सचिन वाझेच्या मालकीचीही काळ्या रंगाचीच मर्सिडीज कार आहे, जी सध्या तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे. ही तीच कार आहे का? वाझेला पोलीस दलात 9 जून रोजी पुन्हा रुजू करण्यात आलं होतं. कनेक्शन?” असा सवाल नितेश राणेंनी विचारला आहे.

“मालवणी पोलीस ठाण्याने निष्पक्ष तपास न केल्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले. बरोबर? आणि आता त्याच पोलीस ठाण्याला राज्य महिला आयोगाने अहवाल सादर करण्यास सांगितले? हे कितपत योग्य आहे? ते कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत?” असा प्रश्नही नितेश राणेंनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.