भारतीय संरक्षण दलाचा जगात चौथा क्रमांक लागतो. संरक्षण दलाचे भूदल, वायूदल आणि नौदल असे तीन मुख्य प्रकार पडतात. भारतीय सैन्य दलांमध्ये पुरुषांप्रमाणेच महिलांचादेखील उल्लेखनीय सहभाग आहे. हा सहभाग आणखी मजबूत करण्यासाठी भारतीय नौदलानं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय नौदल प्रथमच महिला खलाशांना सेवेत सामावून घेणार आहे. चीफ अॕडमिरल आर. हरि कुमार यांनी याबाबत माहिती दिली. भारतीय नौदल प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन हजार अग्निवीर भारतीय नौदलात सामील होत आहेत. त्यापैकी 341 महिला आहेत. भारतीय नौदलात उपलब्ध पदांसाठी अर्ज केलेल्या 10 लाख व्यक्तींमध्ये 82 हजार महिला होत्या. ‘टीव्ही 9 भारतवर्ष’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) पासिंग आउट परेडला संबोधित करण्यासाठी नौदल प्रमुखांना निमंत्रित करण्यात आलं होतं. कारण, चीफ अॕडमिरल आर. हरिकुमार हे एनडीए खडकवासलाचे माजी विद्यार्थी आहेत. 1 जानेवारी 1983 रोजी ते भारतीय नौदलात रुजू झाले होते. पासिंग आउट परेडमध्ये बोलताना त्यांनी नौदलातील महिलांच्या समावेशाबद्दल माहिती दिली.
सैन्यदलांनी जेंडर न्यूट्रल म्हणजेच सर्वलिंगांच्या व्यक्तींना समान संधी दिली पाहिजे, या गोष्टीवर नौदल प्रमुखांनी भर दिला. ते म्हणाले की, या पूर्वी भारतीय नौदलात फायटर पायलट पदावर आणि एअर ऑपरेटर पदावर महिला अधिकाऱ्यांना प्रवेश देण्यात आला होता. खलाशी म्हणून त्यांना संधी दिली गेली नव्हती. मात्र, आता महिला खलाशांचीही भरती केली जात आहे. पुढच्या वर्षी नौदलातील उर्वरित सर्व शाखांमध्ये महिलांना प्रवेश दिला जाईल, असंही नौदल प्रमुख म्हणाले.
महिलांचा चांगला प्रतिसाद
नौदल प्रमुख म्हणाले, “अग्नीवीर भरतीमध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. नौदलातील तीन हजार रिक्त पदांसाठी 10 लाख अर्ज आले होते. त्यापैकी 82 हजार अर्ज महिलांचे होते. त्यापैकी कितीजणी सर्व मानकं पूर्ण करतील आहेत हे आम्हाला माहिती नाही. कारण, सध्या नौदलाकडे पुरुष आणि महिलांसाठी शैक्षणिक आणि शारीरिक पात्रतेसाठी वेगळी मानकं नाहीत. दोघांनाही सारख्या जबाबदारीच्या पदावर नोकरी मिळणार असल्यानं पात्रता निकष सारखेच ठेवण्यात आले आहेत.”
“देशासाठी मेड-इन-इंडिया सुरक्षा पर्याय तयार करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. आयएनएस विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका कार्यान्वित होणं ही भारतासाठी एक ऐतिहासिक घटना होती. गेल्या वर्षभरात लष्करी कार्यप्रणालीच्या बाबतीत भारत अतिशय व्यस्त होता. गेल्या एका वर्षात भारतीय नौदलानं अतिशय उच्च दर्जाचा ऑपरेशनल टेम्पो गाठला आहे,” असंही आर. हरिकुमार म्हणाले.