360 दिवस काय करता?, आत्ताच मराठी भाषा दिन आठवतो का?

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना 4 हजार पोस्टकार्ड पाठवण्यात आले. या पार्श्वभूमीवर फक्त 27 फेब्रुवारी जवळ आल्यावरच मराठी भाषा दिन आठवतो का? असा सवाल माजी मंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे यांनी केलाय. प्रामाणिक प्रयत्न करायचे झाल्यास त्यावर नियमित काम करत राहावं लागतं, असा खोचक टोलाही तावडेंनी शिवसेनेला लगावला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं हे मराठी भाषेचं क्रेडीट असेल. दिल्लीत जाताना सर्वांना सोबत घेऊन जायला हवं. मात्र, तसं होताना दिसत नाही, असंही तावडे म्हणाले.

तावडे पुढे म्हणाले की, मराठी भाषेसाठी सर्वपक्षीय लोकांनी जायला हवं होतं. मुंबई महापालिकेच्या तोंडावर शिवसेना राजकीय स्टंटबाजी करत आहे. विरोधक सोडा पण किमान सत्तेत असणाऱ्यांना तर सोबत घेऊन जायला हवं होतं. 5 दिवस आधी हालचाली होतात. दिल्लीत जाणं येणं सुरु होतं. याचा अर्थ फक्त क्रेडीट घेण्यासाठीच राजकारण सुरु आहे. 5 दिवस आधी काम सुरु करता, मग 360 दिवस काय करत असता? असा खोचक सवाल तावडे यांनी सुभाष देसाई यांना केलाय.

दुसरीकडे संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका करताना पातळी सोडल्याचं पाहायला मिळालं. सोमय्या यांच्यावर टीका करताना त्यांनी शिवराळ भाषेचा वापर केला. इतकंच नाही तर त्यांना हीच भाषा समजते असंही राऊत आज म्हणाले. या पार्श्वभूमीवर विनोद तावडे यांनी संजय राऊतांवर टीका केलीय. ज्या पद्धतीनं शिव्यांचं राजकारण सुरु आहे ते महाराष्ट्राला अभिप्रेत नाही.

राजकारणातील बदललेल्या भाषेमुळं महाराष्ट्राचं नाव बदनाम होत आहे. हे सगळं टाळून मुद्द्याचं राजकारण केलं जाऊ शकतं. संजय राऊत हे संपादक आहेत, माझे मित्र आहेत. पण ज्या पद्धतीनं ते बोलत आहेत, त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेवर शिंतोडे उडाले आहेत एवढं नक्की, अशा शब्दात तावडे यांनी राऊतांच्या सोमय्यांवरील टीकेला प्रत्युत्तर दिलंय. त्याचबरोबर हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आणि संत परंपरेचा महाराष्ट्र आहे का? असा सवाल तावडे यांनी राऊतांच्या भाषेवरुन विचारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.