रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुण्यातील लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. येत्या 15 मे पर्यंत पुण्यात लॉकडाऊन कायम असणार असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. त्यामुळे पुणेकरांना 15 मेपर्यंत सक्तीने कोरोना नियमांचं पालन करावं लागणार आहे.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. पुण्यातील लॉकडाऊन 15 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. जिल्ह्यांतर्गत आणि जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ई-पास काढावा लागणार आहे. आतापर्यंत 9 हजार ई-पास देण्यात आल्या आहेत. नितांत गरज असेल तरच प्रवास करा. अथवा घरातच राहा, असं ट्विट गुप्ता यांनी केलं आहे.
पुणे शहरातील एकूण मृतांपैकी अडीच हजार बळी एकट्या ससून रुग्णालयात गेले आहेत. अडीच हजारापैकी 600 जणांचा मृत्यू हा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच झाल्याची माहिती आहे. ससूनमध्ये क्रिटिकल रुग्णांना उपचारासाठी पाठवलं जात असल्यामुळे ससूनमध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. सध्या 477 रुग्णांवर ससूनमध्ये उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत 6 हजार 498 जणांचा कोरोनानं बळी घेतला आहे. पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला असला तरी मृत्यूची संख्या मात्र आटोक्यात येताना दिसत नाही.