एक्झिट पोलचा अंदाज, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, आसाम मध्ये भाजपा येण्याची शक्यता

पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी वेगवेगळे एक्झिट पोल घेण्यात आलेत. एक्झिट पोलच्या निकालांनुसार तृणमूल कॉंग्रेस पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन करेल. तर केरळमध्ये सत्ताधारी डावी आघाडी पुन्हा सत्तेवर येऊ शकते. आसाममध्ये भाजपला पुन्हा एकदा विजय मिळण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलनुसार तामिळनाडूमध्ये द्रमुकच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष सत्तेत परतू शकेल, तर पुद्दुचेरीमध्ये काँग्रेसचा पराभव जवळपास निश्चित मानला जातोय.

पाच राज्यात निवडणुका झाल्या तरी सर्वांचे लक्ष पश्चिम बंगालच्या निकालाकडे आहे. 2 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतरच अधिकृत निकाल समजू शकतील, परंतु आतापर्यंतच्या सर्व एक्झिट पोलनुसार ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बनू शकतात. एबीपी-सी वोटरनुसार, पश्चिम बंगालमध्ये टीएमसी 152 ते 164 जागा जिंकू शकते, तर भाजपला 109 ते 121 जागा मिळतील, असा अंदाज आहे. रिपब्लिक टीव्ही-सीएनएक्सच्या मते पश्चिम बंगालमध्ये भाजपाला 128 ते 138 जागा मिळू शकतात, तर टीएमसीच्या खात्यात 128 ते 148 पर्यंत जागा जाऊ शकतात. सीएनएन न्यूज 18 च्या एक्झिट पोलनुसार, बंगालमध्ये टीएमसी 162 जागा जिंकून स्पष्ट बहुमताचे सरकार बनवू शकते. सर्व एक्झिट पोलमध्ये कॉंग्रेस आणि डाव्या आघाडीच्या युतीस जास्तीत जास्त 25 जागा मिळतील, असा अंदाज आहे. पण जन की बात एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये 294 पैकी 174 जागा जिंकून भाजप प्रथमच सरकार बनवू शकते. या एक्झिट पोलमध्ये टीएमसीला 112 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

आसाममधील बहुतेक सर्व एक्झिट पोलमध्ये भाजपला सत्ता टिकवून ठेवण्याचा अंदाज आहे. एबीपी-सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार आसाममध्ये एनडीए 58 ते 71 आणि कॉंग्रेसला 53 ते 66 जागा मिळू शकतात. इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 75 ते 85 जागा आणि कॉंग्रेसला 40 ते 50 जागा जिंकता येतील. रिपब्लिक टीव्ही-सीएनएक्सच्या एक्झिट पोलनुसार, भाजप युती 74 ते 84 आणि कॉंग्रेस आघाडी 40 ते 50 जागा जिंकू शकते.

केरळमधील सीपीएम सरकार सत्तेत राहू शकते. दर पाच वर्षांनंतर केरळमध्ये कॉंग्रेस आणि सीपीएम सरकारे येत-जात आहेत. पण या वेळी हा ट्रेंड ब्रेक होताना दिसतोय. इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार सीपीएमच्या नेतृत्वात लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटला 104 ते 120 जागा मिळू शकतात, तर कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफला 20 ते 36 जागा मिळण्याचा अंदाज आहे. रिपब्लिक टीव्ही-सीएनएक्स पोलनुसार एलडीएफने 72-80 जागा जिंकण्याची अपेक्षा आहे, तर यूडीएफचे 58 ते 64 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

वेगवेगळ्या एक्झिट पोलनुसार, तामिळनाडूमध्ये स्टॅलिनच्या नेतृत्वाखालील द्रमुक सरकार बनवू शकते. इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या सर्वेक्षणानुसार द्रमुकला 175 ते 195 जागांवर विजय मिळू शकेल. टुडे चाणक्य एक्झिट पोलनुसार द्रमुक 175 आणि अण्णाद्रमुक 57 जागा जिंकू शकेल. पी-एमएआरक्यूच्या एक्झिट पोलनुसार, द्रमुक आघाडी 165 ते 190 जागा जिंकू शकते, तर एआयएडीएमके 40 ते 65 जागा मिळवेल. रिपब्लिक-सीएनएक्स पोलनुसार द्रमुक 165 जागा जिंकू शकते आणि एआयएडीएमके 62 जागा जिंकू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.