देशातील कोरोना संकट गंभीर झालं असल्याची जाणीव देणारी आकडेवारी सोमवारी समोर आली. देशात पहिल्यांदाच एका दिवसात विक्रमी संख्येनं कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. गेल्या २४ तासांत देशात १ लाखांहून अधिक नागरिकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या, मृत्यू आणि लसीकरण झालेल्या नागरिकांची आकडेवारी जाहीर केली आहे. रविवारी दिवसभरात देशात १ लाख ३ हजार ५५८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ५२ हजार ८४७ जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. या २४ तासांच्या कालावधीत देशात ४७८ म्हणजे जवळपास ५०० जणांचा मृत्यू झाला असून, देशात आतापर्यंत १ लाख ६५ हजार १०१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
देशात एका दिवसात इतक्या मोठ्या रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशात सर्वाधिक ९७ हजार ८९४ रुग्ण आढळून आले होते. १६ सप्टेंबर २०२० रोजी या विक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली होती. कोरोनाच्या पहिल्या लाटेत १६ सप्टेंबर २०२० रोजी देशात एका दिवसांतील आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाली होती.
महाराष्ट्रात अग्रेसर
देशात रविवारी दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णसंख्येमध्ये सर्वाधिक संख्या महाराष्ट्रातील आहे. ४ एप्रिल रोजी तब्बल ५७ हजार नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. ५७ हजार ७४ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, २२२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर १.८६ टक्के असून, आतापर्यंत ५५ हजार ८७८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.