जम्मू काश्मीरचे विभाजनवादी नेते सैयद अली शाह गिलानी (Syed Ali Shah Geelani) यांचं निधन झालंय. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून जम्मू काश्मीर खोऱ्यातील इंटरनेट सेवा बंद केलीय. काश्मीर झोनचे पोलीस महानिरीक्षक (IG) विजय कुमार यांनी याबाबत माहिती दिली. काश्मीरमध्ये कर्फ्यू प्रमाणेच निर्बंध लावण्यात आलेत. गिलानी यांच्या घराच्या आजूबाजूला मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. घराकडे जाणारे सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत. कुणालाही त्यांच्या घराकडे जाण्याची परवानगी नाहीये.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “गिलानी मूळचे सोपोर जिल्ह्यातील होते. त्यामुळे तेथेही निर्बंध लावण्यात आलेत. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी संवेदनशील जागांवर जवान तैनात करण्यात आलेत. कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरू नये म्हणून इंटरनेट बंद करण्यात आलंय.” गिलानी यांच्या निधनानंतर मशिदींमध्ये लाउडस्पीकरवर त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करुन त्यांच्या निधनाची माहिती देण्यात येत आहे.
दीर्घकाळ आजाराने त्रस्त, अखेर 92 वर्षी अखेरचा श्वास
निर्बंध लावण्यात आलेल्या जमात-ए-इस्लामीचे सदस्य आणि हुर्रियत कॉन्फरंसचे कट्टरतावादी संघटनेचे प्रमुख गिलानी मागील दोन दशकांपासून विविध आजारांनी त्रस्त होते. ते 3 वेळा आमदार राहिलेले आहेत. 92 वर्षीय गिलानी यांनी मागील 3 दशकं जम्मू-काश्मीरमधील विभाजनवादी आंदोलनाचं नेतृत्व केलंय. त्यांच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी बुधवारी (1 सप्टेंबर) रात्री 10:30 वाजता शेवटचा श्वास घेतला
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्ष महबूबा मुफ्ती यांनी गिलानी यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलंय. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “गिलानी यांच्या निधनाने दुखी आहे. त्यांच्या अनेक गोष्टींशी आमचे मतभेद होते. मात्र, त्यांची दृढता आणि विश्वासाने उभं राहण्याच्या त्यांच्या स्वभावाचा मी सन्मान करते. अल्लाह त्यांना स्वर्गात (जन्नत) जागा देवो. त्यांच्या कुटुंब आणि शुभचिंतकांबाबत या दुःखातून बाहेर येण्याची शक्ती मिळो.”