जगात भारी, 19 फेब्रुवारी’ अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव. फेब्रुवारी महिना उजाडताच शिवभक्तांना या उत्सवाचे वेध लागतत. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपतींचा हा उत्सव केवळ राज्यापूरताच मर्यादीत राहिलेला नाही तर परराज्यात आणि परदेशातही मोठ्या उत्साहात पार पडत आहे. 19 फेब्रुवारी 1630 ला पुण्यातील शिवनेरी किल्यावर शिवरायांचा जन्म झाला. हा दिवस म्हणजेच शिवजयंती अथवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. शिवजयंती नेमकी कधी साजरी करावी आणि महाराजांची जन्मतारीख कशी ठरवावी यासाठी महाराष्ट्र शासनाने 1966 साली समिती स्थापन केली होती.
या समितीच्या अहवालानुसार आणि भविष्यात हा वाद टाळण्यासाठी शासनाने 2001 साली 19 फेब्रुवारी ही तारीख शिवजयंती साजरी करण्यासाठी जाहीर केली होती. त्याच अनुशंगाने आता गाव खेड्यातील गल्ली-बोळापासून ते राजधानी दिल्ली पर्यंत अनेक समाज उपयोगी कार्यक्रमातून शिवरायांच्या कार्याचा आढावा घेतला जात आहे. काळाच्या ओघात आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून काही निर्बंध असले तरी शिवभक्तांचा उत्साह मात्र कायम आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गृहविभागाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली असली तरी नियम-अटींचे पालन करावे लागणार आहे.शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येणार आहे. आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावे लागणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य स्थापनेचे कार्य हे काही घटकापूरतेच मर्यादीत न राहता त्याची महती सबंध जगभर झाली पाहिजे. मात्र, या उत्सावाची सुरवातही रंजक आहे. असं म्हणतात की, राष्ट्रपिता ज्योतीबा फुले यांनी 1869 साली रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ शोधून काढले आणि महाराजांच्या जीवनावर आधारीत पहिला आणि प्रदीर्घ पोवाडा रचला. शिवरायांचे कार्य महाराष्ट्रातील घराघरात पोहचावे यासाठी त्यांनी 1870 साली पहिल्यांदा सार्वजनिक शिवजयंतीचा कार्यक्रम पुण्यात केला. तेव्हापासून शिवजयंती ही घराघऱात आणि शिवभक्तांच्या मनामनात साजरी होत आहे. आगामी काळात सार्वजनिक कार्यक्रमातून सर्वसामान्य जनतेसमोर छत्रपतींच्या कार्याचा आढावा मांडला जाऊ लागला.
केवळ एका दिवसाच्या उत्सवातून छत्रपतींच्या कार्याचा आढावा घेता येणार नाही तर जयंतीच्या दरम्यान, सप्ताहभर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन हे सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने केले जाते. यामध्ये हिंदवी स्वराज निर्मिती, मराठा साम्राज्याचा इतिहास, महाराजांचे कार्य आणि महाराष्ट्राच्या दुर्गम किल्यांचा अभ्यास घडवून आणला जातो. काळाच्या ओघात शिवजयंती साजरी करण्याची पध्दत बदलत असली तरी उद्देश मात्र कायम आहे. यामध्ये समाज माध्यमांचा वापर हा वाढलेला आहे.
जयंती उत्सव हा केवळ एका दिवसाचा मर्यादीत राहिलेला नसून सार्वजनिक उत्सव समितीच्यावतीने भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. शहरांसह खेडेगावातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचे चौक आहेत. या दरम्यानच्या काळात भगव्या पताका आणि आकर्षक विद्युत रोषणाई हे आकर्षणाचे केंद्रबिंदू असते. सार्वजनिक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, शिवाजी महाराजांची गाणी ऐकणे, शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करणे, सार्वजनिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, सत्यनारायणाच्या पुजेचे आयोजन, बाईक रॅली, एकमेकांना शिवाजी महाराजांचे सुविचार पाठवून, शिवाजी महाराजांची पुस्तके भेट देऊन, शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित नाटके अथवा पथनाट्याचे आयोजन करून हा उत्सव साजरा केला जात आहे.